भारतासारख्या उष्णकटिबंधीय देशात उन्हाळा, पावसाळा व हिवाळा हे प्रामुख्याने तीन ऋतू मानले जातात. या तीनही ऋतूंमध्ये उन्ह, पाऊस व थंडीची कमी अधिक प्रमाणात तीव्रता भारतीयांना अनुभवायला मिळत असते. होळीच्या सणानंतर साधारपपणे उन्हाचा तडाखा जाणवण्यास सुरुवात होते, असे मानतात. तसा तो आता जाणवूही लागला आहे. किंबहुना, यंदाचा उन्हाळा कडक राहणार असून, पश्चिम भारत, मध्य भारताचा काही भाग, वायव्य भारत, उत्तर भारताचा काही भाग, तसेच पूर्वोत्तर भारताच्या काही भागात यंदा कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात उत्तर कोकण व उत्तर महाराष्ट्रात कमाल तापमान हे सरासरीपेक्षा अधिक राहणार असल्याने हा भागही तापणार आहे. स्वाभाविकच यंदाचा उन्हाळा तीव्र राहणार, याची चाहूल लागल्याचे दिसून येत आहे. 2021 प्रमाणे 2022 ही सर्वाधिक उष्ण वर्षांपैकी एक ठरणार का, हे आता पहावे लागेल.
दरवर्षी हवामान विभाग देशभरातील मार्च ते मे या उन्हाळय़ाच्या कालावधीतील कमाल व किमान तापमानाचा अंदाज उन्हाळय़ाच्या सुरुवातीला जाहीर करते. यानुसार हवामान विभागाचे महासंचालक डॉ. एम. मोहापात्रा यांनी यंदाच्या उन्हाळय़ाची वैशिष्टय़े सांगितली आहेत. मार्च, एप्रिल व मे हे उन्हाळय़ाचे तीन प्रमुख महिने आहेत. या कालावधीत खास करून वायव्य भारत, पूर्वोत्तर भारत, मध्य भारताचा काही भाग, हिमालयाच्या पायथ्याजवळील राज्ये, पूर्व किनारपट्टीच्या काही भागात किमान तापमान सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक राहील. याबरोबरच दक्षिण भारत, पूर्व, पूर्वोत्तर भारत, तसेच उत्तरेकडील मैदानी भागात कमाल तापमान हे सरासरीपेक्षा कमी राहणार आहे.
उत्तर कोकणासह अनेक राज्ये होरपळणार
गुजरात, राजस्थान, उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकण, मध्यप्रदेश, छत्तीसगडचा काही भाग, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसामचा काही भाग, तसेच आंध्र किनारपट्टीवर यंदा कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार आहे, यात गुजरातचा काही भाग व राजस्थानच्या काही भागात उन्हाळा तीव्र असेल, तर दरवर्षी उन्हाच्या झळांनी बेजार होणाऱया संपूर्ण दक्षिण भारतात यंदा कमाल तापमान हे सरासरीपेक्षा कमी राहणार आहे.
मध्य, दक्षिण महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाडाही तापणार
याशिवाय उत्तर भारतातील मैदानी राज्ये, पश्चिम बंगाल, सिक्कीम, ओडिशा व पूर्वोत्तर भागातील बहुतांश राज्ये, मध्यप्रदेश, छत्तीसगड, विदर्भ, मराठवाडय़ाचा काही भाग, मध्य महाराष्ट्राचा काही भाग तसेच दक्षिण महाराष्ट्रात कमाल तापमान सरासरीइतके राहील, असे अनुमान आहे. विदर्भ व मराठवाडय़ाकरिता तशा उष्णतेच्या लाटा नव्या नाहीत. परंतु, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हय़ांमधील तापमानही आता चाळीशीच्या आसपास जात आहे. ते आणखी वर जाऊन हे जिल्हेही तापण्याची चिन्हे आहेत.

किमान तापमानही वाढणार
मार्च ते मे या कालावधीत देशातील बहुतांश भागात किमान तापमानात वाढ होईल. यात कोकण व गुजरात किनारपट्टी, पूर्व किनारपट्टी, लडाख, राजस्थानच्या सीमेजवळील भागाच्या किमान तापमान हे सरासरीपेक्षा अधिक राहील, तर दक्षिण भारतात यंदा किमान तापमान सरासरीइतके राहणार आहे.
उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात उन्हाचा कडाका
संपूर्ण उन्हाळयाचा विचार करता मार्च ते मे या कालावधीत उत्तर कोकण तेच उत्तर महाराष्ट्रात कमाल तापमान हे सरासरीपेक्षा अधिक राहणार आहे. त्यामुळे या भागात उन्हाळा तीव्र असेल. दुसरीकडे विदर्भ, मराठवाडय़ाचा बहुतांश भाग, मध्य महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्रात कमाल तापमान हे सरासरीच्या आसपास राहील.
अंदाजाप्रमाणे महाराष्ट्र तापला, राजस्थान, गुजरातेत लाट
मार्चमध्ये राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, विदर्भ, कोकण, गोवा, ओडिशा व तेलंगणच्या भागात उष्णतेची लाट नोंदविण्यात आली. महाराष्ट्रात कोकण-गोवा तसेच विदर्भात उष्णतेची लाट राहिली. दमट हवामान असलेल्या कोकणात उकाडा मोठय़ा प्रमाणात असला, तरी येथील कमाल तापमान 35 अंश सेल्सिअसच्या मागे -पुढे स्थिर असते. मात्र, अलीकडेच रत्नागिरीतील तापमानाने 40 अंशाला नवा विक्रम प्रस्थापित केला. स्वाभाविकच पुढच्या टप्प्यात येथील तापमान कसे राहणार, याबाबत औत्सुक्य असेल. कोकणातील उन्हामुळे आंबा पिकाला याचा फटका बसला, तर विदर्भातील अनेक शहरांनी चाळीशीचा पारा ओलांडला. विदर्भ तसेच कोकण गोव्यात मार्च महिन्यात उष्णतेची लाट राहिली. याशिवाय काही भागात ढगाळ हवामान आणि मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भात तुरळक पावसाने हजेरी लावले.

मान्सूनचे भाकित
यंदाचा मान्सून हा सर्वसाधारण राहणार असल्याचे भाकीत ‘स्कायमेट’ या खासगी हवामान संस्थेने सोमवारी वर्तविले. यावर्षीचा पाऊस सरासरीच्या 96 ते 104 टक्क्यांच्या दरम्यान राहणार असल्याचेही या संस्थेने नमूद केले आहे. ‘स्कायमेट’ ही खासगी हवामान संस्था असून, 2012 पासून मान्सूनचा पूर्वअंदाज देत आहे. याबाबत बोलताना संस्थेचे अध्यक्ष जी. पी. शर्मा म्हणाले, 2020 व 2021 च्या मान्सूनवर ला निनोचा प्रभाव होता. हा प्रभाव आता कमी होत आहे. यंदाच्या मान्सून स्थितीपर्यंत ही स्थिती न्यूट्रल होईल. प्रशांत महासागराच्या समुद्र सपाटीच्या तापमानाची स्थितीही कमजोर असून, हे सर्व संकेत मान्सून सर्वसाधारण राहणार असल्याचे आहेत.
प्रशांत महासागरातील तापमान वाढणार
प्रशांत महासागरातील समुद्रसपाटीचे तापमान येत्या काळात वाढणार असून, यामुळे ला निनोची अधिक स्थिती कमजोर होईल. यामुळे मान्सून सरासरीच्या 96 ते 104 टक्क्यांच्या दरम्यान राहणार असून, देशभरात 880.6 मिमी इतका पाऊस राहणार असल्याची चिन्हे आहेत. आगामी काळात एन्सोही न्यूट्रल असेल. तरीदेखील याबाबत लवकर भाष्य करणे, उचित ठरणार नाही. भारतीय महासागरातील आयओडीची (इंडियन ओशन डीपोल) स्थिती सुरुवातीच्या काळात तटस्थ राहणार आहे. याबाबत अभ्यास सुरू असून, विस्तृत अंदाज एप्रिल महिन्यात देण्यात येणार असल्याचे शर्मा यांनी सांगितले.
जागतिक तापमानवाढीचा परिणाम
जागतिक तापमानवाढ सगळय़ांच्या चिंतेचा प्रश्न आहे. यामुळे निसर्गचक्र बिघडले आहे. यावरच प्रकाशझोत टाकणारा आयपीसीसीचा अहवाल हा डोळय़ात अंजन घालणारा आहे. समुद्राचे वाढत असलेले तापमान, हिमनग वितळण्याचा वाढलेला वेग, वाढलेली चक्रीवादळे, समुद्राची पातळी वाढल्याने समुद्रालगतची शहरे बुडण्याचा धोका हे या अहवालाने अधोरेखित केले आहे. पश्चिम किनारपट्टीवरील शहरांनाही याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईनगरीलाही हा धोका आहे.
हिंदी महासागरात उष्ण लाटांमध्ये वाढ; मान्सूनवर परिणाम
दुसरीकडे हिंदी महासागरात उष्णतेच्या लाटांमध्ये वाढ झाल्याचा अहवाल इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजीमधील शास्त्रज्ञांनी जाहीर केला आहे. या उष्णतेच्या लाटांमुळे भारतीय मान्सून व हिंदी महासागरातील जैवविविधतेवर होत आहे. या लाटांमुळे मध्य भारतातील पावसाचे प्रमाण कमी, तर दक्षिणेकडे पाऊस वाढत आहे. हिंदी महासागराच्या पश्चिम भागात याचे प्रमाण जास्त आहे. 1982 ते 2018 च्या कालावधीत पश्चिमी हिंदी महासागरात 66 समुद्री उष्ण लाटा नोंदवण्यात आल्या. याचदरम्यान उत्तर बंगालच्या उपसागरात 94 उष्णतेच्या लाटा निर्माण झाल्या. यामुळे जैवविविधतेवर मोठा परिणाम झाला आहे. लाटांमुळे वाऱयांचा प्रवाह बदलतो. त्यामुळे मान्सूनच्या देशातील वितरणावरही परिणाम होत असल्याची निरीक्षणे नोंदविण्यात आली आहेत.
2021 सर्वाधिक उष्ण वर्ष
तापमानाच्या नोंदी सुरू झाल्याच्या 120 वर्षांच्या इतिहासात 2021 हे वर्ष देशातील पाचवे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले आहे. या वर्षांत देशातील जमिनीलगतचे वार्षिक तापमान सरासरीच्या तुलनेत 0.44 अंश सेल्सिअसने अधिक असल्याचे समोर आले आहे. यापूर्वी चारवेळा सर्वाधिक वार्षिक तापमानाची नोंद झाली आहे. आता त्यात पाचव्या वर्षांची भर पडली असून, या पाच वर्षांमध्ये 2016 मध्ये आजवरच्या सर्वोच्च तापमानाची नोंद झाली आहे. भारतीय हवामान विभागाने 2021 मधील तापमानाबाबत भाष्य करणारा अहवाल जाहीर केला असून, त्यात याबाबतची माहिती नोंदविण्यात आली आहे. जागतिक तापमानवाढीचे परिणाम गेल्या काही वर्षांमध्ये भारतातही दिसून येत असून, 1997 पासून देशातील तापमान कमी-अधिक प्रमाणात सरासरीच्या तुलनेत वाढलेलेच दिसून येत आहे. गेल्या सुमारे 25 वर्षांच्या कालावधीत एकदाही वार्षिक तापमान सरासरीच्या खाली नोंदविले गेले नसल्याचे 1901 पासूनच्या तापमानाच्या नोंदीवरून स्पष्ट होत आहे. भारतीय हवामान विभागाकडून सध्या 1981 ते 2010 या कालावधीतील तापमान लक्षात घेऊन त्याची सरासरी काढण्यात आली आहे. त्यानुसार 2021 या वर्षांत तापमान सरासरीच्या पुढे होते आणि ते आजवरच्या नोंदीतील पाचवे सर्वांत उष्ण वर्ष ठरले आहे. आजपर्यंत 2008, 2009, 2016 आणि 2017 या वर्षांत सरासरीच्या तुलनेत सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. त्यानंतर वाढीव तापमानाच्या पाचव्या स्थानावर 2021 हे वर्ष आहे. या वर्षांत देशात वार्षिक सरासरी तापमान सरासरीच्या तुलनेत 0.44 अंश सेल्सDिासने अधिक होते. मात्र, ते 2016 या वर्षांच्या तुलनेत कमी होते. आजवरच्या नोंदींमध्ये उष्ण वर्ष म्हणून पाच वर्षांच्या यादीत सर्वात वर असलेल्या 2016 मध्ये देशातील तापमान सरासरीच्या तुलनेत 0.71 अंश सेल्सिअसने अधिक होते. आता 2022 च्या तापमानावर लक्ष असेल.
– अर्चना माने–भारती, पुणे