वार्ताहर/ कडोली
कडोली येथील जागृत देवस्थान ग्रामदैवत श्री कलमेश्वर देवालयाचा यावर्षीचा गाव मर्यादित दसरा उत्सव शुक्रवार दि. 23 पासून साजरा होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी देवालयाचे लांबूनच दर्शन होणार आहे.
कोरोना महामारीमुळे सणासुदीवर मोठा परिणाम झाला आहे. गर्दी टाळण्यासाठी यात्रांवर बंदी आली आहे. पण परंपरागत धार्मिक कार्यक्रम पार पाडावेच लागतात. यासाठी साधेपणाने का होईना सर्वत्र यात्रेचे आयोजन होताना दिसत आहे. असाच कडोलीतील श्री कलमेश्वर देवालयाचा ऐतिहासिक दसरा उत्सव साधेपणाने आणि गाव मर्यादित करण्याचा निर्णय ग्रा. पं. देवस्थान पंच, हक्कदार आणि गावकऱयांनी घेतला आहे. सालाबादप्रमाणे सर्व धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. मात्र, यावेळेस देवालयाचे दर्शन लांबून होणार आहे. मंदिरात बांधण्यात येणाऱया बन्नीपर्यंतच भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी मास्क आवश्यक असणार आहे.
शुक्रवार दि. 23 रोजी अष्टमीनिमित्त देवालयांना श्रीफळ वाढविण्याचा कार्यक्रम सायंकाळी 6 पर्यंत होणार आहे. यासाठी भाविकांनी दिवसा श्रीफळ वाढवून घ्यावेत, असे आवाहन देवस्थान पंच कमिटीने केले आहे.
शनिवार दि. 24 रोजी खंडेनवमी निमित्त शस्त्रपूजन तसेच विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. शिवाय रात्रभर केळीच्या झाडांची बन्नी बांधण्याचा कार्यक्रम पार पडणार आहे.
तर रविवार दि. 25 रोजी यात्रेचा मुख्य दिवस असून पहाटेपासून कोरोना महामारीमुळे नियमांचे पालन करीत सर्व धार्मिक विधी पार पडतील. डॉल्बीसह सर्व वाद्यांविना बैलांची मिरवणूक काढण्यात येणार आहे. दिवसभर सर्व विधी पार पडल्यानंतर देवालयाच्या पालख्या सोने लुटण्यासाठी सीमेवर नेल्या जातात.