केदनूर ग्रा. पं. चे माजी अध्यक्ष राजू पाटील यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन : टाळ-मृदंगाच्या गजरात ग्रंथदिंडी : मान्यवरांसह विविध भजनी मंडळांचा सहभाग

मोहन कुटे /कडोली
37 व्या कडोली मराठी साहित्य संमेलनात रविवारी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मराठीचा जागर करण्यात आला. या संमेलनाच्या निमित्ताने गावच्या वेशीतील श्री जोतिबा मंदिरासमोर हभप बाळकृष्ण निंगाप्पा चौगुले यांच्या हस्ते पालखीपूजन आणि ग्रंथपूजन झाल्यानंतर टाळ-मृदंगाच्या गजरात ग्रंथदिंडीला सुरुवात झाली. ग्रंथदिंडीत श्री कलमेश्वर भजनी मंडळ, श्री कलमेश्वर वारकरी भजनी मंडळ आणि श्री ज्योतिर्लिंग महिला भजनी मंडळांनी भाग घेतला होता.
संमेलनाध्यक्ष प्रा. आनंद मेणसे, प्रा. स्वरुपा इनामदार, उद्घाटक राजू पाटील, प्रमुख पाहुणे, साहित्य संघाचे अध्यक्ष बाबुराव गौंडवाडकर, अरुण पाटील, भरतकुमार भोसले, बसवंत शहापूरकर, बसवंत मायाण्णाचे, मोहन पाटील, संभाजी पवार, किशोर पाटील, रणजित गिंडे, शिवाजी कुटे, विनोद भोसले, शिवराज कालकुंद्रीकर, तानाजी कुटे, भरमा डोंगरे, विलास बामणे, विनोद होनगेकर, प्रफुल्ल पाटील, के. टी. उच्चुकर, श्रीधर, नाडगौडा पाटील, ऍड. शाम पाटील, राजू पवार, संभाजी पवार, शंकर चिंचनगी, अनिल कुटे, महादेव चौगुले, चंद्रकांत पाटील, किशोर पाटील, ग्रा. पं. सदस्य व ग्रामस्थ सहभागी झाले होते. ग्रंथदिंडीत विद्यार्थ्यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत होती.
साहित्यिकांचे स्वागत
ग्रंथदिंडी संमेलनस्थळी आल्यानंतर साहित्यिकांचे सुवासिनेंनी आरती ओवाळून स्वागत केले. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते जीवन भोसले यांच्या हस्ते फित कापून स्वामी विवेकानंद संमेलननगरीचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी शिवप्रतिमा पूजन श्री सिद्धेश्वर ऍग्रो सेवा केंद्राचे कल्लाप्पा देसाई, सावित्रीबाई फुले प्रतिमापूजन शिवाजी मरगाळे यांच्या हस्ते, सरस्वती प्रतिमापूजन कंग्राळी खुर्दच्या रुक्मिणी निलजकर यांच्या हस्ते, संत ज्ञानेश्वर प्रतिमापूजन सुजाता मायाण्णाचे यांच्या हस्ते, महात्मा फुले प्रतिमापूजन सामाजिक कार्यकर्त्या संगीता पाटील यांच्या हस्ते झाले. त्यानंतर केदनूर ग्रा. पं. चे माजी अध्यक्ष राजू पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून 37 व्या कडोली मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. संमेलन व्यासपीठाचे उद्घाटन बसवंत शहापूरकर यांच्या हस्ते झाल्यानंतर संमेलनाध्यक्ष, साहित्यिक आणि मान्यवर व्यासपीठावर स्थानापन्न झाले.
श्री शिवाजी हायस्कूलच्या विद्यार्थिनींच्या ईशस्तवन आणि स्वागतगीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी साहित्य संघाच्यावतीने व्यासपीठावरील उपस्थित संमेलनाध्यक्ष, साहित्यिक आणि मान्यवरांचे मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर बाबुराव गौंडवाडकर यांनी प्रास्ताविक केले. तर स्वागताध्यक्ष धनंजय सुरेश मारिहाळकर यांनी स्वागत केले. याप्रसंगी कडोलीचे सर्वोदयी कार्यकर्ते, माजी आमदार कै. सदाशिवराव भोसले, थोर साहित्यिक कै. द. मा. मिरासदार, कै. सिंधुताई सपकाळ, सीडीएस बिपिन रावत या दिवंगतांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
आजची महिला सक्षम

प्रा. स्वरूपा इनामदार यांचे प्रतिपादन
सावित्रीबाई फुलेंमुळे देशात साक्षरता निर्माण झाली आहे. त्यांनी पुण्यात शिक्षणाची ज्योत आणली आणि त्याचा पुढे विस्तार वाढला. आज महिला समाजकारण, राजकारण आणि विविध क्षेत्रात पुढे येत आहेत. त्यामुळे महिला सक्षम झाल्याचे चित्र दिसत आहे, असे उद्गार प्रा. स्वरूपा इनामदार यांनी काढले. संमेलनाच्या दुसऱया सत्रात त्या ‘आजची महिला ः नवा दृष्टीकोन’ या विषयावर बोलत होत्या.
आजच्या संगणक, इंटरनेट आणि विज्ञान युगात महिला पुरूषांच्या बरोबरीने काम पाहात आहेत. विविध पातळीवर निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आली आहे. मुलांना शिक्षणाबरोबर चांगले संस्कारही आवश्यक आहेत. सु-संस्कारित मुले घडविण्यासाठी माताही आदर्शवत असली पाहिजे. ज्ञान, विनयता, प्रेम आणि समजुदारपणा या गोष्टी प्रत्येक स्त्राrकडे असल्या पाहिजे. याकरिता आजू-बाजूचा परिसर आणि संगत महत्त्वाची आहे. याबरोबर परिस्थिती पाहून महिलांनी जागृत रहाणे आवश्यक आहे, असे प्रा. स्वरूपा इनामदार यांनी सांगितले.
स्वातंत्र्य चळवळीत साहित्यिकांची भूमिका महत्त्वाची

संमेलनाध्यक्ष प्रा. आनंद मेणसे यांचे प्रतिपादन : सरकारी मराठी शाळेच्या प्रांगणात संमेलन उत्साहात ” रसिकांची उपस्थिती

स्वातंत्र्य चळवळीत झोकून दिलेल्या अनेक साहित्यिकांची भूमिका महत्त्वाची आहे. त्या-त्या भाषेतील साहित्यिकांनी त्या-त्या वेळचे प्रश्न साहित्यातून मांडले आहेत. अनेक साहित्यिक राजकारणात सक्रिय झाले होते. पंडित नेहरू, विनोबा भावे, आचार्य अत्रे, गोखले, आगरकर आदींनी साहित्याबरोबर राजकारणात देखील आपली भूमिका प्रखडपणे मांडली होती, असे विचार प्रा. आनंद मेणसे यांनी व्यक्त केले.
मराठी साहित्य संघ कडोली, सर्व संघ-संस्था, कडोली ग्रामस्थ, सांगाती साहित्य अकादमी बेळगाव व अक्षरयात्रा दैनिक तरुण भारत बेळगाव यांच्यावतीने पॉलीफ्लो पॉलिहैड्रॉन पुरस्कृत 37 व्या कडोली मराठी साहित्य संमेलनात ते संमेलनाध्यक्ष म्हणून बोलत होते. सरकारी मराठी प्राथमिक शाळेच्या प्रागंणात हे संमेलन रविवारी उत्साहात झाले.
आनंद मेणसे पुढे म्हणाले, ज्या विभागीय भाषा आहेत, त्या आज नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. याकरिता त्या-त्या भागातील भाषा समृद्ध होण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. जो देश शिक्षणावर 6 टक्क्मयांपेक्षा अधिक खर्च करतो. तो देश शिक्षणाच्या बाबतीत पुढारलेला असतो. भारतात केवळ 1.7 टक्के शिक्षणावर खर्च होतो. त्यामुळे शाळांची अवस्था दयनीय झाली आहे. अनेक शाळांतून इमारतीचा अभाव, पाणी, शिक्षक व सुविधा नसल्यामुळे परिस्थिती गंभीर बनत चालली आहे.
साहित्य संमेलन हा करमणुकीचा विषय नाही. जोपर्यंत राजकीय पक्ष आपली भूमिका नेटकेपणाने पार पाडत नाहीत, तोपर्यंत साहित्यिक, लेखक व पत्रकारांची जबाबदारी अधिक असते, असे त्यांनी सांगितले.
शब्दगंध कवी मंडळातर्फे कवी संमेलन

37 व्या कडोली मराठी साहित्य संमेलनाच्या तिसऱया सत्रात शब्दगंध कवी मंडळाचे कवी संमेलन उत्साहात पार पडले. प्रारंभी संघाचे माजी अध्यक्ष बसवंत शहापूरकर यांनी व्यासपीठावरील उपस्थित कवींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी कवयित्री नेत्रा जोशी यांनी नुकत्याच झालेल्या महिलादिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांवर आधारित कविता सादर केली तर कवयित्री स्मिता किल्लेकर यांनी ‘आक्रोश’ या आपल्या कवितेतून शेतकऱयांच्या शेतीवर जेव्हा बुलडोझर फिरतो तेव्हा होणाऱया यातनांवर कविता सादर केली.
विविध कविता सादर
याप्रसंगी अशोक अलगोंडी यांनी ‘जयंती’, प्रा. स्वरुपा इनामदार यांनी ‘आई’, सुधाकर गावडे यांनी ‘भेद दृष्टीचा’, महादेव चौगुले यांनी ‘आईची माया’, बाळू मस्कार यांनी ‘बंधूप्रेम’, चंद्रशेखर गायकवाड यांनी ‘प्रदूषण’, परशराम खेमणे यांनी ‘केमिकल’ या कविता सादर केल्या.
समाज प्रबोधनपर ओवी सादर
शिवाय रुक्मिणी निलजकर यांनी समाज प्रबोधनपर ओवी सादर केल्या. बसवंत शहापूरकर यांनी संमेलनाच्या शेवटी ‘वंशाचा दिवा’ ही कविता सादर करून संमेलनाची सांगता केली. संमेलनासाठी अल्पोपहाराची व्यवस्था दत्ता पाटील, कोरे गल्ली, शहापूर यांनी केली होती.