शिवशक्ती मंदिरामध्ये चोरीचा प्रकार : नागरिकांमध्ये चिंता
प्रतिनिधी / बेळगाव
कणबर्गी येथील सिद्राय कलखांबकर यांच्या शिवशक्ती मंदिरामधील दानपेटी चोरटय़ांनी चोरुन नेली आहे. सदर घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे. कणबर्गी येथे सिद्राय कलखांबकर यांनी शिवशक्ती मंदिर स्वतःच्या जागेमध्ये बांधले आहे. त्यामध्ये दानपेटी होती. सोमवारी रात्री रोजच्या प्रमाणे ते मंदिर बंद करुन घरी परतले. सध्या मंदिराच्या कळसाचे काम सुरू आहे. त्यामुळे काही जणांनी देणगी दिली होती. ती देणगीही त्या दानपेटीतच घालण्यात आली होती. याचबरोबर त्यामध्ये इतर कागदपत्रे व हिशेबाची वही देखील होती. मंगळवारी सकाळी चोरटय़ांनी ती दानपेटी चोरुन नेल्याचे सिद्राय यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी गावातील काही जणांना बोलावून त्याची माहिती दिली. याचबरोबर त्यांनी माळमारुती पोलिसांनाही याची माहिती दिली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.