चार एमएलडी क्षमतेचा प्रकल्प उभारण्यात येणार

बेळगाव / प्रतिनिधी
दहा एकरहून अधिक जागेत नवीन वसाहत निर्माण करताना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बंधनकारक आहे. त्यामुळे कणबर्गी येथे बुडाकडून निर्माण करण्यात येणाऱया रहिवासी वसाहत योजनेसाठी चार एमएलडी क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे. याकरिता बेंगळूर येथील प्रकल्पाची पाहणी बुडाच्या अधिकाऱयांनी नुकतीच केली आहे.
बुडाच्यावतीने कणबर्गी येथे वसाहत योजना राबविण्यात येणार आहे. 165 एकर जागेत राबविण्यात येणाऱया वसाहतीचे काम सुरू करण्यास राज्य शासनाने हिरवा कंदील दर्शविला आहे. सदर योजनेच्या अंमलबजावणीस बुडाच्यावतीने लवकरच प्रारंभ करण्यात येणार आहे. याकरिता हालचाली सुरू झाल्या असून पावसामुळे जमीन सपाटीकरण करण्याचे काम रखडले आहे. बुडाच्या बैठकीत याबाबत चर्चा झाल्यानंतर हद्द निश्चिती करून योजनेच्या कामाला सुरूवात करण्यात येणार आहे. मात्र 10 एकरहून अधिक जागेत नवीन वसाहत योजना राबविताना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प निर्माण करणे बंधनकारक आहे. बुडाच्या वतीने कणबर्गी येथील हा प्रकल्प निर्माण करण्यात येणार आहे.
योजनेंतर्गत येणाऱया भूखंडाच्या आणि लोकसंख्येच्या आधारे चार एमएलडी क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचा निर्णय बुडाने घेतला आहे. सांडपाणी एकत्रित करून त्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. सदर प्रकल्प उभारणीसाठी बुडाने राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविला असून, बेंगळूर येथील प्रकल्पाची पाहणी बुडाच्या अधिकाऱयांनी नुकतीच केली. बुडाचे कार्यकारी अभियंता एस. सी. नाईक व साहाय्यक कार्यकारी अभियंता एम. व्ही. हिरेमठ यांनी बेंगळूर येथील सांडपाणी प्रकल्पाची माहिती घेतली आहे. सदर प्रकल्पात सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्या पाण्याचा वापर उद्यानासाठी केला जातो. अत्याधुनिक पद्धतीच्या प्रकल्पाची उभारणी बेळगावात बुडाच्यावतीने करण्यात येणार आहे.