सातारा स्थानिक गुन्हे शाखा व फलटण पोलिसांची संयुक्त कारवाई
प्रतिनिधी/ सातारा
कुरेशीनगर फलटण येथे परिसरात सातारा स्थानिक गुन्हे शाखा व फलटण पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत कत्तल करण्यासाठी डांबून ठेवलेल्या 26 गोवंशीय जनावरांची पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत शाहरुख जलील कुरेशी वय 27 रा. कुरेशीनगर, मंगळवार पेठ, फलटण याच्यावर फलटण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.
दि. 7 रोजी कुरेशीनगर, फलटण येथे कत्तल करण्यासाठी जनावरे डांबून ठेवली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना मिळाली होती. त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे यांच्या पथकास त्या ठिकाणी जावून कारवाई करण्याच्या सूचना केल्या.
तपास पथकाने कुरेशीनगर फलटण येथे अचानक पणे छापा घातला असता कुरेशीनगर येथील आखरी रस्ता, स्मशानभूमीकडे जाणाऱया रोडवर सार्वजनिक जागेत पत्र्याचे शेडमध्ये पाहणी केली केली असता तिथे शाहरुख कुरेशी उभा होता. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने शेडमध्ये दाटीवाटीने बांधून ठेवलेली गोवंशीय जातीची मोठी 15 व लहान 11 अशी 26 जनावरे ही कत्तल करण्यासाठी आणली असल्याचे सांगितले.
त्याच्या विरुध्द फलटण शहर पोलीस ठाण्यात प्राण्यांचे संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्हयातील 1 लाख 64 हजार रूपये किंमतीची गोवंशीय 26 जनावरे देखभालीसाठी सदगुरु यशवंतबाबा, गोपालन संस्था झिरपवाडी ता. फलटण जि. सातारा यांच्या ताब्यात देण्यात आहेत. तर संशयित आरोपीस फलटण शहर पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले आहे.
या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे, सहाय्यक फौजदार उत्तम दबडे, हवालदार तानाजी माने, सुधीर बनकर, मोहन नाचण, पोलीस नाईक अजित कर्णे, अर्जुन शिरतोडे, रविंद्र वाघमारे, वैभव सांवत, विजय सावंत तसेच फलटण शहर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक विशाल भंडारे व बनकर यांनी सहभाग घेतला.