‘पेटीएम’द्वारे काढता येईल कदंब बसचे तिकीट
प्रतिनिधी /पणजी
कदंब परिवहन महामंडळाने पेटीएममार्फत मोबाईल तिकीट पद्धतीचा शुभारंभ केला असून आता महामंडळाच्या कोणत्याही बसमधून प्रवास करताना मोबाईल फोनमधून तिकीट काढता येईल व बसचे आरक्षणही करता येणार आहे. महामंडळाचे अध्यक्ष कार्लुस आल्मेदा यांच्याहस्ते पणजी बसस्थानकावर या मोबाईल तिकीट खरेदी – विक्रीचा शुभारंभ करण्यात आला.
या नवीन पद्धतीच्या मोबाईल तिकीटामुळे महामंडळ ‘हायटेक’ बनले आहे. या पद्धतीमुळे प्रवाशांना आता तिकीट खरेदीसाठी पैसे देण्या – घेण्याची कटकट संपणार आहे, अशी माहिती आल्मेदा यांनी देऊन या नवीन पद्धतीचा प्रवाशांनी आपल्या मोबाईलमार्फत फायदा करुन द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. कदंब महामंडळाचे इतर अधिकारी त्यावेळी उपस्थित होते.
या मोबाईल तिकीट पद्धतीचा लाभ दररोज कदंब बसमधून प्रवास करणाऱया सुमारे 1 लाख प्रवाशांना होणार असल्याचे सांगण्यात आले. या पद्धतीत कोणत्याही बसचे तिकीट अगोदर आरक्षित करणे शक्य होणार आहे. क्यूआर कोडवर आधारित हे तिकीट असून त्यासाठी पेटीएम हे ‘ऍप’ मोबाईलवर डाऊनलोड करावे लागणार आहे, अशी माहिती देण्यात आली.
प्रवाशांना आता रोख पैसे देण्याची गरज नाही. त्यामुळे सुट्टय़ा पैशांची कटकट संपणार आहे. प्रदूषण टाळण्यासाठी नवीन 100 इलेक्ट्रीक बस घेण्याची प्रक्रिया महामंडळाने सुरु केली असून त्या गावोगावी सुरु करण्याचा इरादा आहे. पणजी – मडगांव मार्गावर चालू असलेल्या 10 इलेक्ट्रीक बसगाडय़ा सध्या कोरोनामुळे बंद आहेत. डिसेंबर 2021 पर्यंत 20 इलेक्ट्रीक बसगाडय़ा कदंबच्या ताफ्यात सामील होणार आहेत. संचारबंदी उठवल्यानंतर प्रमुख मार्गावर 30 इलेक्ट्रीक बसगाडय़ा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती आल्मेदा यांनी दिली.