अचूक बातमी “तरुण भारत”ची, सोमवार, 17 मे, सकाळी 11.30
● जिल्ह्यात आकडे ओसरू लागले पण इतकेही नव्हे ● महिन्यानंतर आकडा हजारच्या आत ● मात्र तपासण्याही तीन पटीने झाल्यात कमी ● पॉझिटिव्हीटी रेट तर महिन्यातला जास्त
सातारा / प्रतिनिधी :
राज्याबरोबर जिल्ह्यातले आकडे ओसरू लागले आहेत. मात्र, सोमवारी आलेला आकडा गेल्या महिनाभरात पहिल्यांदाच हजारच्या आत म्हणजे 881 इतका आहे. मात्र सध्या दैनंदिन 6 हजार तपासण्या होत होत्या त्या काल म्हणजे रविवारी केवळ 1 हजार 920 इतक्या कमी झाल्याने हा आकडा आकुंचला आहे.
अहो, आश्चर्यम. जिल्हा रुग्णालयात एकही बाधित सापडलेला नाही
गेल्या वर्षभरात जे घडलं नाही एव्हडे मोठे आश्चर्य घडले आहे. सातारा जिल्हा रुग्णालयात दैनंदिन दोन ते अडीच हजार तपासण्या केल्या जातात. काल रविवारी इथे केवळ 37 जणांच्या तपासण्या झाल्या त्यात एकही बाधित आढळून आलेला नाही. गेल्या पूर्ण वर्षांत असं पहिल्यांदाच घडलं असावं की, जिल्हा रुग्णालयात एकही बाधित आढळून आलेला नाही.
आकडा कमी पण पॉझिटिव्हीटी जास्त
रविवारी तपासण्या कमी त्यामूळे सोमवारचा आकडा कमी….! हे साधे गणित आहे. सध्या साधारणतः पॉझेटिव्हीटी रेट 32 टक्के इतका आहे. रविवारी 1 हजार 165 RAT चाचण्या झाल्या त्यात 530 बाधित आढळले म्हणजे पॉझेटिव्हीटी 45.49 % इतकी होती तर 755 जणांनी RTPCR चाचण्या केल्या त्यात 351 जण बाधित आढळून आले आहेत. म्हणजे इथेही 45.49% इतकीच पॉझेटिव्हीटी दिसून आली आहे.
आलेख खाली येतोय
सोमवारचा आकडा तसा फसवा असला तरी एकूणच जिल्ह्याचे आकडे कमी होऊ लागले आहेत. पूर्वानुभवांती सोमवारी व मंगळवारी मुक्त होण्याचा आकडा जास्त असतो त्यामुळे उपचारार्थ रुग्ण संख्या झपाट्याने कमी होण्याचे संकेत आहेत. उतरता आलेख पाहून निष्काळजी वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे अजूनही हलगर्जीपणा नको, अनावश्यक प्रवास-फिरणं नको.
लसीकरणाला गती देण्याची गरज
जिल्ह्यात आता लसीकरणाचे नियम बदलून टाकले आहेत. कोव्हॅक्सिन तर उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येतेय तर कोव्हिशिल्डचे लसीकरण सुरु आहे. रविवारी जिल्हय़ात 2,721 जणांना लस देण्यात आलीय. यामुळे पहिला डोस घेण्याची एकूण संख्या 5 लाख 70 हजार 309 झाली आहे. तर आतापर्यंत 1 लाख 13 हजार 834 जणांनी लस घेतल्याने एकूण जिल्हय़ात एकूण लस घेणाऱयांची संख्या 6 लाख 84 हजार 143 एवढी झाली असल्याचे डॉ. अनिरुध्द आठल्ये यांनी सांगितले.
जिल्ह्यात 1,993 बेड रिक्त
जिल्हय़ात कोव्हिड हॉस्पिटल्स वाढवण्यात आली असून व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेडही वाढवण्यात आले आहेत. जिल्हय़ात 6 हजार 498 बेड उपलब्ध असून त्यापैकी कोव्हिड हॉस्पिटल्समध्ये 4,502 तर कोरोना केअर सेंटर 1,996 असे मिळून ही संख्या आहे. यामध्ये प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 3,503 एवढी असून जिल्हय़ात 1,993 बेड रिक्त असले तरी ज्या रुग्णांना आवश्यक आहेत त्यांना ते मिळण्यासाठी नियोजन करण्याची आवश्यकता आहे. यामध्ये कोरोना केअर सेंटर्स मध्ये 930 तर कोव्हिड हॉस्पिटल्समध्ये दाखल 3,575 यामध्ये आयसीयू व्हेंटीलेटरसह 19 बेड, आयसीयू व्हेंटिलेटरविना 23, ऑक्सिजनसह 626 बेड आणि ऑक्सिजनविना 259 बेड रिक्त आहेत.
सोमवारी प्राप्त आकडेवारी : नमुने : 1 हजार 920 बाधित : 881 मुक्त : 924 बळी : 43
एकूण आकडेवारी : नमुने : 6 लाख 39 हजार 988 बाधित : 1 लाख 36 हजार 668 मुक्त : 1 लाख 11 हजार 207 बळी : 3 हजार 185 उपचारार्थ : 22 हजार 255