गतिरोधक उभारा !अन्यथा रस्ता वाहतूकीसाठी बंद करा
प्रतिनिधी /फोंडा
ढवळी-फर्मागुडी बगलरस्त्यावरील कपिलेश्वरी जन्क्शनवर वाढत्या अपघाताच्या सत्रामुळे गतिरोधक उभारण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे. काल सोमवारी एका पत्रकाराला चारचाकीने धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती.
ढवळी-फर्मागुडी बायपासमार्गे बुलेट शोरूमजवळील कपिलेश्वरी जन्क्शन ओलांडून खडपाबांध मार्गे फेंडा गाठण्याच्या पवित्र्यात असताना हा अपघात घडला. भरधाव वेगाने ढवळीहून फर्मागुडी जाणाऱया ईनोव्हा चारचाकीने पत्रकाराच्या दुचाकीला धडक दिली. यात पत्रकार गंभीर जखमी झाला. या जन्क्शनवर गतिरोधक उभारण्यात यावी अशी मागणी केली आहे. मागील काही दिवसापुर्वी फोंडा पालीकेने धोकादायक रस्तावरील जन्क्शनमुळे हा जोडरस्ता बंद करण्याचा निर्णय घेतला होता. स्थानिक लोकप्रतिधीनेने व ग्रामस्थांनी याला तिव्र विरोध केल्यानंतर जोडरस्ता वाहतूकीसाठी खुला करण्यात आला होता. मात्र यासाठी सुरक्षितेचे कोणतीच उपाययोजना करण्यात आलेली नाही. विरोध करणाऱयांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यानेच आज अनेकांना हा रस्ता ओलांडताना अपघाताना सामोरे जावे लागत आहे. रस्ता ओलांडताना गुरांचाही बळी गेलेला आहे. या जन्क्शनवर गतिरोधक उभारून पांढरे पट्टे मारा, नपेक्षा खडपाबांधला जोडणारा जोडरस्ता कायमचा वाहतूकीसाठी बंद करा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
राज्यातील सार्वजनिक बांधकाम खाते सुस्त
वाढत्या अपघाताचे सत्र लक्षात घेता आधी रस्ते सुरक्षित करा. गरजेच्या ठिकाणी गतिरोधक उभारा, वाहतूकदारांना सतर्क करण्यासाठी सुचना फलक उभारा त्यानंतरच भरमसाठ चलन फाडा असा टाहो सद्या फोंडय़ातील वाहनचालकांनी फोडलेला आहे. आमोणा खांडोळा पुलाजवळ सायंकाळच्या सुमारास रस्त्यावर गतिरोधक कोणताही सुचनाफलक व पांढरे पट्टे न लावता उभारण्यात आला होता. रात्रीच्या काळोखात दुचाकीचे अपघात घडू लागल्यानंतर मंत्री गोविंद गावडे यांच्यावर घटनास्थळावर जाऊन गतिरोधकावरा पांढरे पट्टयाची रंगोटी करण्याची वेळ आली. इथपर्यत राज्यात सार्वजनिक बांधका खाते निष्क्रीय झालेले आहे. सर्वत्र रस्त्याची वाताहत झालेली असून सुचनाफलकही दिसेनासे झालेले आहे.