वार्ताहर/ साखरपा
रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील कोंडगाव वाणीवाडी येथे गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या बाजूला उलटून ट्रकचालकाचा जागीच मृत्यू झाला. यात अजय नीलकंठ शिंदे (25, रा. मठधामापूर, ता. संगमेश्वर) असे मृत झालेल्या चालकाचे नाव आहे. 23 डिसेंबर रोजी मध्यरात्री 2 च्या सुमारास हा अपघात घडला. अजय शिंदे हा ताम्हाने पंचक्रोशीत एक नावाजलेला कबड्डीपटू म्हणून प्रसिद्ध होता.

रत्नागिरीवरून सिमेंटची पोती घेऊन आयशर ट्रक मलकापूरला निघाला होता. मात्र एका अवजड वळणावर रस्त्याचा अंदाज न आल्याने ट्रक पूर्णपणे उलटला. यावेळी डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने अजय शिंदे हा जागीच गतप्राण झाला. या घटनेची खबर मिळताच साखरपा पोलीस दूरक्षेत्राचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी आणण्यात आला. यावेळी मृताचे नातेवाईक व मित्रमंडळी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपस्थित होते. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विद्या पाटील, अंमलदार गायकवाड, वैभव कांबळे आदी करीत आहेत.