कबनूर /प्रतिनिधी
येथील मुख्य चौकात लगत असलेल्या दवाखान्यातील पॉझिटिव्ह असलेल्या एक नामवंत डॉक्टराच्या घरातील पाच जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तसेच साई नगर मधील 47 वर्षाच्या पुरुषालाही कोरोना लागण झाली आहे. चोवीस तासांमध्ये कबनूरात सहा रुग्ण आढळून आले. आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या 10 झाली आहे.
या घटनेमुळे गावात खळबळ माजली आहे. गावात कोरोणाचे सत्र सुरु झाल्यामुळे गावकऱ्यांना आता कोरोनाची धास्ती लागली आहे. कबनूर ता. हातकणंगले येथील मुख्य चौकातून कबनूर हायस्कूलकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या दवाखान्यातील नामवंत डॉक्टर पॉझिटिव्ह आले होते. त्यांच्यावर कोल्हापूर येथील डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. यांनतर यांच्या घरातील सहाजणांना अतिग्रे येथील संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये स्वॅब घेण्यासाठी पाठवण्यात आले होते. सहा जणांचा अहवाल प्राप्त झाला आहे. यामध्ये डॉक्टरांच्या वडिलांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर डॉक्टरांची पत्नी, आई, भाऊ, भावजया व भावाचा मुलगा असे एकाच घरातील पाच जणांना लागण झाली आहे.
तसेच येथील साई नगरातील 47 वर्षे पुरुषालाही कोरोनाची लागण झाली आहे .डीकेटीई विलगीकरण कक्षात त्याच्यावर उपचार चालू आहेत. इचलकरंजी शहरा नजीक असलेल्या कबनुरात यापूर्वी एकही रुग्ण आढळून आलेला नव्हता मात्र कबनूर गावाने इचलकरंजी शहराच्या अगोदर ग्रामपंचायतीने गावात लॉक डाऊन जाहीर केले होते. त्यानुसार गावात शंभर टक्के लॉक डाऊन सुरू आहे. गावात लॉक डाऊन ची परिस्थिती असताना ही 24 तासांमध्ये एकूण 7 रुग्ण आढळून आले आहेत. डॉक्टरांना कोरोना झाल्याचे आढळून आल्यानंतर दवाखाना परिसर व त्यांच्या घर परिसर सील करण्यात आले होते. त्याचप्रमाणे साईनगर परिसर ग्रामपंचायतीच्या वतीने सील करून निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. अशी माहिती सरपंच सुनील स्वामी व ग्राम विकास अधिकारी बी . टी. कुंभार यांनी दिली.