दिग्गज अभिनेते कबीर बेदी यांची आत्मकथा ‘स्टोरीज आय मस्ट टेल ः द इमोशन लाइफ ऑफ द ऍक्टर’चे प्रकाशन अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या हस्ते करण्यात आले आहे. कबीर यांच्या आत्मकथेच्या सादरीकरण कार्यक्रमात प्रियांका लंडनमधून व्हर्च्युअल पद्धतीने सामील झाली आहे. कबीर बेदी हे स्वतःच्या आत्मकथेसह पहिल्यांदाच लेखक झाले आहेत. तर प्रियांकाने अलिकडेच स्वतःची आत्मकथा ‘अनफिनिश्ड’सोबत लेखिकेच्या स्वरुपात पदार्पण केले आहे.
‘स्टोरीज आय मस्ट टेल ः द इमोशनल लाइफ ऑफ द ऍक्टर’मध्ये कबीर बेदी यांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनातील उतार-चढाव मांडण्यात आले आहेत. विवाह आणि घटस्फोटासह तुटलेली नाते, त्याचे परिणाम, भारत, युरोप आणि हॉलिवूडमधील अनुभव पुस्तकात नमूद आहेत. एक माणूस म्हणून झालेली जडणघडण यात मांडण्यात आलेली आहे. अभिनेत्री परवीन बाबी यांच्यासोबतच्या प्रेमसंबंधांवरही पुस्तकात प्रकाश टाकण्यात आला आहे.