नारळ हा निसर्गातील कल्पवृक्ष आहे, असे आपण नेहमीच म्हणतो. आपण नारळातील खोबरे वापरतो व करवंटी फेकून देतो. मात्र या नारळाच्या करवंटीपासून अनेकविध शोभिवंत वस्तू तयार करता येतात. टाकाऊ करवंटीपासून स्मृतिचिन्ह, चषक, मेणबत्ती स्टेड, मोबाईल स्टेड अशा नानाविध उपयोगी वस्तू देखील आपण यापासून बनवू शकतो.

लहान असताना टाकाऊतून टिकाऊ वस्तू बनवून आणा असे शिक्षकांनी सांगितले की, करवंटय़ांपासून तबले हे लहानमुलांना बनवायला फार आवडायचे अन् झटपट करूनही व्हायचे. आता या करवंटीपासून आपल्याला नानाविध प्रकारचे कलाविष्कार बनवता येऊ शकतात. हे बनविण्याचे विशेष प्रशिक्षणही देण्यात येते. करवंटीपासून एखादी कलाकृती साकार करायची झाली तर ही करवंटी तासून एकदम सुळसुळीत करणे महत्त्वाचे. पूर्वी विशिष्ट प्रकारच्या सुरीच्या सहाय्याने हे तासण्याचे काम केले जायचे. आता व्यवसाय म्हणून करवंटीपासून शोभेच्या किंवा इतर उपयोगाच्या वस्तू बनवायच्या झाल्या तर यंत्राच्या सहाय्याने करवंटी सुळसुळीत केली जाते. अशाने वेळही वाचतो अन् सहजगतीने करवंटी सुळसुळीत होते. आपल्या ऊजेचा देखील यामुळे बचाव होतो.

भिन्न आकारातून साकारू उत्तम आविष्कार
व्यवसाय म्हणून अशा करंवटय़ापासून वस्तू करायच्या झाल्या तर विविध आकाराच्या करवंटय़ा मिळाल्या तर उत्तम अशा आकृती तयार होऊ शकतात. यासाठी नारळ विक्रेत्यांकडे येरझाऱया मारून भिन्न आकाराचे नारळ गोळा देखील केले जातात. काही वाकडे-तिकडे, निसर्ग नियमाने वेगळा असा आकार घेऊन जन्माला आलेले नारळ अशा शोभेच्या, उपयुक्त वस्तू तयार करण्यासाठी कामी येतात. यामुळे पाहणाऱयाला त्या करवंटय़ापासूनच केल्या की नाही याची शंका देखील येऊ शकते.

घरच्याघरी बनवा सुंदर ‘बाऊल’
आपण बनविलेला खाद्यपदार्थ बघताच तोंडाला पाणी सुटावे असे वाटत असेल तर त्यासाठी त्याची सजावट महत्त्वाची असते. आपण तो कुठच्या भांडय़ात घालता हेही तेवढेच महत्त्वाचे असते. अनेकदा आपल्या घरी पाहुणे यायचे झाले की बाजारातून छानसे ‘बाऊल’ आणून त्यात आपण केलेला पदार्थ घालून आपण तो पाहुण्यांना खायला देतो. पण हे करत असतानाच आपण स्वतः जर असे सुंदर ‘बाऊल’ घरीच तयार केले तर… म्हणजे नावीन्य असे काहीतरी पाहून पाहुणेही खूश होतील अन् त्यांना झालेला आनंद पाहून आपणालाही बरे वाटेल. आपण करवंटीला सुंदर रंगवून त्यापासून आकर्षक असे ‘बाऊल’ बनवू शकता.

प्लास्टिकला उत्तम पर्याय
करवंटीपासून निसर्गाला कुठलीही हानी होत नसल्याने त्यापासून बनविलेल्या अनेक गोष्टींचा उपयोग आपण करू शकता. आपण खरेदी करतानादेखील अशाच गोष्टी मुळात खरेदी करू शकतात ज्या ‘ईको फ्रेण्डली’ आहेत. करवंटीपासून बनविलेल्या विविध वस्तू प्लास्टिकला उत्तम असा पर्याय देखील ठरू शकतात.