मिरज इतिहास मंडळाच्या अभ्यासकांचे संशोधन
मानसिंग कुमठेकर / मिरज
कराड येथील शिवाजी विद्यालयाच्या प्रागंणात शिवकालीन गध्देगाळ शिल्प सातारा येथील कला-वाणिज्य महाविद्यालयाचे प्रा. गौतम काटकर आणि मिरज इतिहास मंडळाचे अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर यांना आढळून आले आहे. सन १६५३ मधील हा गध्देगाळ असून मौजे सेगाव येथील जमीन दान दिल्याचे त्यावर म्हटले आहे. तत्कालीन सामाजिक इतिहासाच्या अभ्यासासाठी हे शिल्प उपयुक्त आहे.
गद्धेगाळ म्हणजे काय?
गध्देगाळ ही शिलालेखांसारखीच लेखयुक्त शिल्पे असतात. मात्र, त्यावर संबंधीत शिलालेखांत लिहिलेले नियम, आज्ञा मोडू नये. नागरिकांनी त्याचे पालन करावे, यासाठी शेवटी शापवचनासारखी काही वाक्ये लिहिली असतात. त्यामध्ये गाढवावरुन दिलेली शिवी असते आणि या शिवीत लिहिल्याप्रमाणे गाढव आणि स्त्रीचे शिल्पांकनही केलेले असते. प्रथमदर्शनी हे शिल्प आणि त्यावरील शिवीसदृष्य वाक्य हे अशिष्ट वाटले तरी त्यामागे केवळ शिवीगाळ करणे हा उद्देश नसतो. तर राजाज्ञा अथवा नियम मोडले तर कोणते परिणाम भोगावे लागतील, याचा इशारा देणारी ही वाक्ये असतात. अशा वाक्यांमधून शिलालेखांमधील आज्ञा अथवा नियम भंग करण्याचे धारिष्टय कोणी करणार नाही, असा उद्देश गध्देगाळ लिखाणात असतो आणि ही आज्ञा गावातील सर्व नागरिकांच्या दृष्टीस पडावी, यासाठी असे गध्देगाळ हे गावाच्या प्रमुख ठिकाणी ठेवलेले असतात.

मिरज इतिहास मंडळाचे संशोधन
मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक प्रा. गौतम काटकर आणि मानसिंगराव कुमठेकर हे कराड परिसरात संशोधन करीत असताना त्यांना शिवाजी विद्यालयाच्या प्रागंणात गध्देगाळ आढळून आला. तो उलटा करून जमीनीत पुरून ठेवला आहे. त्यामुळे गध्दे गाळीवरील शिल्पांकन वरील बाजूस आले आहे. हा गध्देगाळ १२ ओळींचा असून, त्यावर सके १५७५ म्हणजेच सन १६५३ असा कालोल्लेख आहे. मौजे सेगाऊ येथील जमीन दान दिली असून त्यावरील कर माफ केल्याचे म्हटले आहे. या लेखाच्या शेवटी ‘हे लिहिविल येणे न पाळी त्यास गडव’ असे शापवचन कोरले आहे. अक्षरवाटिका आणि भाषा शैली ही शिवकालीन आहे. बारा ओळींच्या मजकुराबरोबरच गाढव आणि एका व्यक्तीचे चित्र शिल्पांकित केले आहे. तर वरील बाजूस सुर्य-चंद्र कोरले आहेत.
श्री शिवाजी विद्यालयाचे तत्कालीन इतिहास विषयाचे शिक्षक भगवानराव घारगे यांनी विद्यालयात पुरातन संग्रहालय केले होते. त्यांनी विविध ठिकाणाहून ऐतिहासिक वस्तू, शिलालेख जमा करून विद्यालयात ठेवले होते. त्यापैकी भाळवणी येथील सन ११७३ चा कलचुरी राजा रायमुरारी सोयिदेव याचा कानडी लेख आणि यादव नृपती दुसरा सिंघण याचा सन १२१६ मधील देवनागरी लेख येथे आहेत. हे दोन्ही लेख वि. भि. कोलते यांनी प्रसिध्द केले आहेत. मात्र, त्या शेजारीच हा गद्धेगाळ होता. तो आजवर अप्रकाशीत होता. सातारा येथील कला, वाणिज्य महाविद्यालयाचे इतिहास विषयाचे प्रा. गौतम काटकर आणि मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष मानसिंगराव कुमठेकर यांनी हे गध्देगाळ शिल्प उजेडात आणले असून लवकरच त्यातील लेखावर शोधनिबंध प्रसिध्द करण्यात येणार आहे. या संशोधनासाठी श्री शिवाजी विद्यालयाचे अध्यक्ष जयंतरावकाका पाटील, मुख्याध्यापक बी. बी. साळुंखे, सातारा येथील कला-वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप गायकवाड, डॉ. आर.बी. सातपुते यांचे सहकार्य लाभले. कराड येथील या गध्देगाळ शिल्पावरुन तत्कालीन सामाजिक इतिहासाचा अभ्यास करण्यास मदत होणार आहे.
