कराडात मुदतबाह्य हॅण्डवॉशचा मोठा साठा जप्त
प्रतिनिधी / कराड
कराड बसस्थानक परिसरात छापा टाकून मुदत संपलेल्या हॅण्डवॉशचा मोठा साठा पोलिसांनी जप्त केला. डीवायएसपी सूरज गुरव यांच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईत लाखो रुपयांचे हॅण्डवॉशचे 90 बाॅक्स पोलिसांनी हस्तगत केले आहेत. तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींना हे मुदतबाह्य हॅण्डवॉशचा पुरविल्याचे उघड झाले असून पोलीस त्याबाबतची माहिती घेत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे मेडिकल व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कराड बसस्थानक परिसरातील एका इमारतीत मेडिकलचा साठा करण्याचे गोडाऊन आहे. या गोडाऊनमध्ये मुदत संपलेल्या हॅण्डवॉशचा व डेटाॅलचा साठा असल्याची माहिती डीवायएसपी सुरज गुरव यांना खबऱ्याकडून समजली. त्यानुसार त्यांनी शनिवार दि. 4 रोजी सकाळी या गोडाऊनवर पोलिसांच्या मदतीने छापा टाकला. या छाप्यामध्ये तपासणी करत असताना त्यांना 2016 मध्ये मुदत संपलेला मुदतबाह्य हॅण्डवॉशचा मोठा साठा आढळून आला. 2013 मध्ये हा सर्व मला तयार करण्यात आला असून त्यानंतर तो तीन वर्षे वापरण्याची मुदत होती. म्हणजेच हा सर्व साठा 2016 मध्येच कालबाह्य झाला होता. असे असतानाही या सर्व कालबाह्य हॅण्डवॉशचे प्रिंटिंग चेंज करून ते पुन्हा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विक्रीसाठी उपलब्ध केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
या मुदतबाह्य साठ्यापैकी अनेक बॉक्स तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींनी नेल्याची बाबही समोर आली असून पोलीस त्याबाबत माहिती घेत आहेत. या कारवाईमध्ये पोलिसांना हॅण्डवॉशचे 90 बॉक्स आढळून आले असून ग्रामपंचायतींना दिलेला वेगळाच साठा असल्याचे डीवायएसपी सुरज गुरव यांनी सांगितले. ज्या ग्रामपंचायतींना मला पुरवला आहे, त्याच्याशी संपर्क करण्याचे काम सुरू असून संबंधित गोडावून मालकासह डिस्ट्रीब्यूटरवरही गुन्हा दाखल करणार असल्याचेही डीवायएसपी सुरज गुरव यांनी सांगितले. दरम्यान मुदतबाह्य साठा जप्त केल्याने मेडिकल व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून कोरोना सारख्या महाभयंकर संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर लोकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार असून याबाबत जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे.
Trending
- योजना सुरू नाहीच, बिल 12 हजार
- बेळगाव-मोपा चौपदरी महामार्ग व्हावा!
- हिंदुत्ववादी संघटना आक्रमक : कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून बंदी आदेश लागू
- सरकारी कर्मचाऱ्यांची वैद्यकीय बिले वेळेत मंजूर करा
- रिंगरोडसाठी कदापिही जमीन देणार नाही!
- कन्नड सक्तीविरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन
- बेळगाव-दिल्ली रेल्वेप्रवास होणार आरामदायी
- विविध मंडळांतर्फे शिवराज्याभिषेक सोहळा