लवकरात लवकर केवायसी जमा करण्याचे अवसायक मनोहर माळी यांचे आवाहन
प्रतिनिधी / कराड
कराड जनता सहकारी बँक दिवाळखोरीत निघाली असून ठेवीदारांचे अडकलेले पैसे परत देण्यासाठी अवसायक मनोहर माळी तातडीने पावले उचलली आहेत. बँकेच्या सात जिल्हय़ातील 29 शाखांमध्ये ठेवीदारांचे क्लेम फॉर्म आणि केवायसी फॉर्म भरून घेण्यास मंगळवार 15 पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती अवसायक तथा उपनिबंधक मनोहर माळी यांनी दिली.
कराड जनता बँकेच्या सर्व ठेवींना 5 लाख रूपयांचे विमा संरक्षण आहे. बँकेचा परवाना रद्द करताना रिझर्व्ह बँकेने 99 टक्के ठेवीदारांचे 5 लाखाच्या आतील पैसे परत देणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार गत आठवडय़ात ठेव विमा व पतहमी कार्पोरेशनच्या अधिकाऱयांबरोबर बँक अधिकाऱयांची बैठक पुण्यात झाली होती. यात ठेवीदारांची केवायसी घेण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार अवसायक मनोहर माळी यांनी बँकेच्या मुख्य कार्यालयासह सर्व शाखांमध्ये ठेवीदारांचे क्लेम फॉर्म आणि केवायसी फॉर्म भरून घेण्याची प्रक्रिया मंगळवार 15 पासून सुरू केली आहे.
याबाबत ठेवीदारांना आवाहन करताना मनोहर माळी म्हणाले की, ठेव विमा व पतहमी कार्पोरेशन (डीआयसीजीसी) कडून बँकेच्या सर्व ठेवीदारांना एकुण 5 लाखापर्यंतची रक्कम परत मिळण्यासाठी क्लेम फॉर्म भरून देणे आवश्यक आहे. हे क्लेम फॉर्म बँकेच्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत. सर्व ठेवीदारांनी हे फॉर्म घेऊन भरून द्यावेत. त्यासोबत आपली केवायसी कागदपत्रे जोडून ती नजीकच्या शाखेत जमा करावीत. हे फॉर्म लवकरात लवकर भरून सहकार्य करावे.
दरम्यान, बँकेचे 31 मार्च अखेरचे ऑडीट सुरू असून ते पूर्णत्वाकडे आले आहे. यानंतर 7 डिसेंबरअखेरपर्यंतचे ऑडीट करण्यात येणार असल्याचे अवसायक माळी यांनी सांगितले.