शहरातील ऍक्टिव्ह रूग्णांची संख्या 64 वर शनिवार पेठेत सर्वाधिक 26 रूग्ण
वार्ताहर / कराड
कराड शहरात चार ते पाच दिवसांत कोरोना बाधितांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ झाल्याने ऍक्टिव्ह रूग्णांची संख्या 64 झाली आहे. रूग्ण वाढीमुळे शहरात 34 मायक्रो कंटेनमेंट झोन करण्यात आले असून शनिवार पेठेत सर्वाधिक 26 ऍक्टिव्ह रूग्ण आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नगरपालिका व नागरी आरोग्य केंद्राच्या माध्यमातून युद्धपातळीवर उपाययोजना राबवण्यात येत आहेत.
कराड तालुका कोरानासाठी हॉटस्पॉट ठरला असतानाही पालिका, नागरी आरोग्य केंद्र, पोलीस व महसूल प्रशासनाने योग्य नियगोजन केल्याने शहरातील कारोनाच्या प्रसारावर चांगले नियंत्रण मिळवल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र जिल्हय़ात व तालुक्यात पुन्हा कोरोनाचा प्रसार वेगाने होऊ लागल्याने शहरातही रूग्णांच्या संख्येत झपाटयाने वाढ होत आहे. गेल्या चार ते पाच दिवसांत शहरातील बाधितांत वाढ झाल्याने पालिका व आरोग्य विभाग अधिक सतर्क झाला आहे.
बुधवार अखेर शहरातील 64 रूग्ण उपचारात आहेत. यात शनिवार पेठेतील सर्वाधित 26 रूग्ण आहेत. रविवार व शुक्रवार पेठ 14, सोमवार व बुधवार पेठ 4, मंगळवार पेठ 2, गुरूवारपेठेत 18 रूग्ण ऍक्टिव्ह आहेत. नागरी आरोग्य विभागाच्या माध्यमातून 34 मायक्रो कंटेनमेंट झोन करण्यात आले असून या सर्व झोनमध्ये नियमित सर्व्हेचे काम सुरू आहे. एकीकडे बाधितांची संख्या वाढत असली तरी नागरी आरोग्य केंद्र व उपजिल्हा रूग्णालयाच्या माध्यमातून लसीकरणही वेगाने सुरू आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मुख्य बाजारपेठ, प्रीतिसंगम बाग, मंडई, प्रशासकीय कार्यालये आदी गर्दीच्या ठिकाणी विनामास्क फिरणारे व सोशल डिस्टन्सच्या नियमांचे उल्लंघन करणाऱया लोकांविरोधात पोलीस व पालिका प्रशासनाने कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. बाजारपेठेसह फूटपाथवरील व्यावसायिकांकडून कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन होत आहे. अनेक व्यावसायिक विनामास्क व्यवसाय करताना पाहावयास मिळत आहेत. या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.