कोल्हापूर/प्रतिनिधी
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. बुधवारी भाजपकडून सत्यजित कदम तर काँग्रेसकडून जयश्री जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. दरम्यान, कोल्हापूर उत्तरच्या मैदानात करुणा मुंडे यांची एंट्री झाली आहे. करुणा मुंडे आज कोल्हापुरात असून त्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
करुणा मुंडे आज कोल्हापुरात असून त्यांनी या आधी कोल्हापूर उत्तराची निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले होते. उत्तर पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून करुणा मुंडेही आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेऊन आज उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे करुणा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच देवीच्या आशीर्वादाने विजय प्राप्त होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी करुणा मुंढे म्हणाल्या, जनतेचा आवाज म्हणून विधानसभेत जाण्याची इच्छा आहे. जनतेने निवडून दिल्यास चांगलं काम करू. तसेच महिलांची सुरक्षा आणि सक्षमीकरणावर काम करणार आहे. यानिवडणुकीत कोल्हापुरातील घराणेशाहीचे राजकारण संपवणार आहे. घराणेशाहीमुळे कोल्हापूरचा विकास थांबला आहे. यापुढे त्याला गती मिळेल असेही त्या यावेळी म्हणाल्या.