बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात शनिवारी गेल्या चोवीस तासात कोरोनाचे ४१९ रुग्ण सापडले. तर उपचारानंतर ४३० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात सध्या ५,९१० रूग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान राज्यात एकूण कोरोना बाधितांची संख्या ९,४४,८५३ वर पोहोचली आहे. तर यापैकी ९,२६,६६४ रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी परतले आहेत. शनिवार पर्यंत राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ९८.०७ टक्के होता. तर मृत्यू दर १.२९ टक्के होता.
गेल्या काही दिवसात मृत्युदरात किरकोळ वाढ झाली आहे. राज्यात कोविडमुळे आता पर्यंत १२,२६३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी चार जणांचा मृत्यू झाला. आरोग्य विभागाने राज्यात गेल्या २४ तासांत ३,७४७ जलद प्रतिजैविक आणि ६२,३०३ आरटी-पीसीआर चाचणीसह एकूण ६६,०५० नवीन नमुन्यांची चाचणी केली आहे.
दरम्यान बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या सर्वाधिक आहे. शनिवारी जिल्ह्यात २५८ कोरोना बाधितांची भर पडली. यासह जिल्ह्यात आतापर्यंत संक्रमित रुग्णांची एकूण संख्या ४,०१,७७५ वर पोहोचली आहे. तर ३,९३,३९० रुग्ण कोरोनावर विजय मिळावीत रुग्णालयातून घरी परतले आहेत. बेंगळूरमध्ये कोरोनामुळे ४,४२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात सध्या ३,९५७ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.