बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे. गुरुवारी राज्यात ४ हजारपेक्षा कमी रुग्णांची नोंद झाली. तसेच पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही जास्त होती. गुरुवारी राज्यात ३,९७९ नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्याचबरोबर राज्यात ९,७६८ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले आहेत. तर १३८ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दरम्यान, राज्यात सध्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या १,१०,५२३ वर पोहोचली आहे. गुरुवारी राज्यात सकारात्मकतेचा दर २.४६ टक्के होता.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट सुरूच आहे. गुरुवारी जिल्ह्यात ९६९ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. तसेच ३,१७६ रुग्ण कोरोनावर विजय मिळवीत रुग्णालयातून घरी परतले. तर जिल्ह्यात कोरोनामुळे १४ संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.