बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात सहाव्या दिवशी कोरोनाचे ५ हजाराहून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. गेल्या सहा दिवसांत एकूण ३१,१६८ लोकांना कोरोना संसर्ग झाला आहे. त्यापैकी मंगळवारी ५,५३६ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. तर १०२ जणांचा मृत्यू झाला आहे.
कर्नाटकात मंगळवारी एका दिवसात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. यासह, कोरोना बाधितांची एकूण संख्या १,०७,००१ वर पोहोचली आहे. यापैकी, ६४४३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत आणि ४०५०४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मंगळवारी एकाच वेळी २८१९ रूग्णांना बरे झाल्याने रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
राज्य आरोग्य विभागाने मंगळवारी आणखी १०२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. यातील पाच रुग्णांचा घरी मृत्यू झाला होता तर दोन रुग्णांना मृत अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आले होते. कोरोनामुळे आतापर्यंत २०५५ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आयसीयूमध्ये ६१२ रुग्ण दाखल आहेत.
गेल्या ३४ तासांत एकूण, ३७७२० नमुन्यांची चाचणी घेण्यात आली असून त्यात १६३४० जलद प्रतिजैविक चाचण्या घेण्यात आल्या आहेत. आतापर्यंत एकूण १२,४२७७१ नागरिकांची तपासणी केली आहे.
तसेच राजधानीत नवीन ५५३६ रुग्णांपैकी १८९८ रूग्ण सापडले आहेत. बेंगळूरमध्ये संक्रमित लोकांची एकूण संख्या ४८८२८ वर पोहोचली आहे. यापैकी ३५१०२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर १२७६१ रूग्ण बरे झाले आहेत. त्यापैकी ५७२ रुग्णांना मंगळवारी रुग्णालयातून डिस्चार्ज दिला आहे. कोरोनाने आता पर्यंत बेंगळूरमध्ये ९५७ रुग्ण दगावले आहेत. मंगळवारी कोरोनाने ४० जणांचा मृत्यू झाला आहे.