बेंगळूर/प्रतिनिधी
अग्रभागी कामगारांच्या यादीमध्ये परिवहन महामंडळाच्या कर्मचार्यांचा समावेश केल्यानंतर राज्य सरकारकडून परिवहन कर्मचाऱ्यांचे लसीकर करण्यात येत आहे. बेंगळूरसह राज्यातील विभागांमध्ये केएसआरटीसी कर्मचाऱ्यांसाठी लसीकरण शिबिरे आयोजित केली आहेत.
केएसआरटीसी अअधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेंगळूरमधील लसीकरण शिबीर हे शांतीनगरमधील केएसआरटीसी केंद्रीय प्रशिक्षण संस्थेत आहे. “केएसआरटीसीचे एमडी शिवयोगी सी कलसद यांनी शिबिराला भेट दिली आणि वैद्यकीय कर्मचारी आणि महामंडळाच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. राज्यातील सर्व विभागांमधून घेण्यात आलेल्या अशा शिबिराची माहितीही त्यांनी मिळविली,” असे निवेदनात म्हटले आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून परिवहन कर्मचारी आपली सेवा बजावत आहेत. दरम्यान, अनेक परिवहन कर्मचाऱ्यांना पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कोरोनाची लागण झाली आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे कर्मचाऱ्यांचा बळीही गेला आहे. कोरोनाकाळात महत्वाची कामगिरी बजाविणाऱ्या केएसआरटीसी कर्मचाऱ्यांना बऱ्याच दिवसापासून कोरोना लसीकरण करण्याची मागणी होत होती. आत प्रत्यक्षात लसीकरणाला सुरुवात झाली असल्याने कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.