बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकमध्ये मंगळवारी सलग चौथ्या दिवशी कोरोना प्रकरणातही घट झाली. मंगळवारी याज्यात नवीन ६,२९७ रुग्णांची नोंद झाली आहे. नेहमीप्रमाणे राजधानी बेंगळूरमध्ये सर्वाधिक रुग्णांची भर पडली. बेंगळूर शहरी जिल्ह्यात मंगळवारी २,८२१ नवीन संक्रमित रुग्णांची नोंद झाली आहे. राज्याला दिलासा देणारी बाब म्हणजे पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होती. राज्यातील विविध जिल्ह्यात मंगळवारी ८,५०० रुग्णांनी कोरोनावर मत केली. राज्यात मंगळवारी एकूण ६६ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यापैकी ३६ जण बेंगळूर मधील आहेत. राज्यात आतापर्यंत कोरोना संसर्गामुळे १०,६०८ लोकांचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या ७ लाख ७६ हजारावर पोहोचली आहे. मंगळवारी राज्यात कोरोना रुग्णांची एकूण सक्रिय प्रकरणे १,०३९४५ होती. तर राज्यात ९८,२३६ जणांची तपासणी करण्यात आली. यापैकी बेंगळूरमध्ये ६४,५२३ सक्रिय रुग्ण आहेत. दरम्यान बेंगळूर शहरी जिल्ह्यात मंगळवारी २,७९८ रुग्ण बरे झाल्याने घरी परतले. जिल्ह्यातील कोरोना संसर्गामुळे आतापर्यंत ३,५७८ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.