बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने बऱ्याच ठिकाणी रुग्णांना बेड मिळणे अवघड झाले आहे. बेड अभावी रुग्णांना रुग्णालयाबाहेर ताटकळत उभं रहावं लागत आहे. दरम्यान बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने बेडचा काळाबाजर होत असल्याच्या तक्रारी नागरिकांमधून आल्या आहेत. तसेच काळाबाजार करत असल्याचे समजताच पोलिसांनी संबंधितांवर कारवाई देखील केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी आज बेंगळूर येथील बीबीएमपी अधिकाऱ्यांकडून कोरोना बेडच्या परिथितीचा आढावा घेतला.
बेंगळूर महानगरपालिकेच्या कोविड रुग्णांसाठी बेड वाटपाच्या यंत्रणेतील घोटाळ्याप्रकरणी भाजपा खासदार तेजस्वी सूर्य आणि पक्षाच्या दोन आमदारांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश पोलिसांच्या गुन्हे शाखेला दिल्यानंतर एका आठवड्यानंतर, कर्नाटकचे मुख्यमंत्री बेंगळूर बीबीएमपी वॉर रूमला भेट देण्यासाठी गेले. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांकडून केंद्रीय बेड व्यवस्थापन यंत्रणेचा आढावा घेतला.