ऑनलाईन टीम / मुंबई :
कलानगर जंक्शन इथल्या वांद्रे सी-लिंक ते बीकेसी उड्डाणपुलाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधताना लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला.

- आता वाहतूक कोंडी कमी होईल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, मुंबईतल्या वाहतूकीच्या दृष्टीने विशेषत: कलानगर जंक्शनला होणाऱ्या ट्राफिकच्या दृष्टीने हा उड्डाणपूल अत्यंत महत्त्वाचा असेल. सी-लिंक पासून थेट बीकेसीला हा उड्डाणपूल जोडला जाईल, त्यामुळे या परिसरात होणारी वाहतूकीची कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि नागरिकांचा देखील त्रास कमी होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पुढे ते म्हणाले, माझे बालपण या परिसरात गेले आहे. गेली कित्येक वर्ष…66 सालापासून आम्ही इथे राहतो आहोत. या परिसराशी माझ्या जुन्या खूप आठवणी आहेत. कालनगर पासून वांद्रे स्थानक…तेव्हा तो बेहरामपाड्याचा रस्ता देखील नव्हता. तेव्हा मी या रस्त्याने चालत जात होतो आणि रेल्वे रुळावरुन उतरुन प्लॅटफॉर्मवर जायचो. आज मला समाधान आहे. इथली वस्ती वाढली…बीकेसीमध्ये ट्राफिक वाढले. त्या ट्राफिकला उत्तर म्हणून वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून एकेक मार्ग स्वीकारत आहोत, त्याचे आज लोकापर्ण करत आहोत. मला खात्री आहे, या मार्गिकेमुळे कलानगर जंक्शनच्या परिसरात होणारी वाहतूक कोंडी होणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, या प्रकल्पासाठी 103 कोटी 73 लाखांची तरतूद करण्यात आली होती. एकूण तीन मार्गिकेपैकी बांद्रा कुर्ला संकुल ते बांद्रा वरळी सागरी मार्गाकडे जाणारी मार्गिका 21 फेब्रुवारी 2021 मध्ये वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. त्यानंतर आज बांद्रा वरळी सागरी मार्ग ते बांद्रा कुर्ला संकुल ही मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे.