महिला स्पर्धेत शिरगांवचे लईराई मंडळ अव्वल

प्रतिनिधी /फोंडा
राजीव गांधी कला मंदिर फोंडा, आयोजित 13 व्या राज्य स्तरीय घुमट आरती स्पर्धेत म्हापसा येथील श्री साई बोडगेश्वर घुमट आरती मंडळाला प्रथम पारितोषिक प्राप्त झाले. रु. 30,000 व फिरता चषक त्यांना प्रदान करण्यात आला. रविवारी या स्पर्धेची अंतिम फेरी झाली व त्यानंतर निकाल जाहीर करण्यात आला. महिलांसाठी घेण्यात आलेल्या दुसऱया राज्यस्तरीय घुमट आरती स्पर्धेत श्री लईराई महिला घुमट आरती मंडळ, शिरगांव, डिचोली या पथकला प्रथम पारितोषिक मिळाले. त्यांना रु. 10,000 व फिरता चषक देण्यात आला.
खुल्या गटातील स्पर्धेत 35 तर महिला विभागातील स्पर्धेत 17 पथकांनी भाग घेतला. पुरुष गटातील स्पर्धेत द्वितीय हेरंब घुमट आरती मंडळ, धारगळ पेडणे तर तृतीय स्वर साई आरती मंडळ, म्हापसा यांना मिळाले. त्यांना अनुक्रमे रु. 25000 व रु. 20,000 अशी पारितोषिके देण्यात आली.
उत्तेजनार्थ प्रथम श्री ब्राह्मणी देवी आरती मंडळ तळेवाडा, पाळी, द्वितीय श्री दाडेश्वर आरती मंडळ, बिठ्ठोण, बार्देश व तृतीय श्री गणेश घुमट आरती मंडळ नादोडा, बार्देश यांना देण्यात आली. उत्कृष्ट समुह गायनासाठी साई बोडगेश्वर, म्हापसा, उत्कृष्ट समुह घुमट वादनासाठी हेरंब आरती मंडळ, धारगळ, उत्कृष्ट कासाळें वादनासाठी पवन नाईक (नवसाई आरती मंडळ, बोरी), उत्कृष्ट शामेळ वादनासाठी वामन शिरोडकर (स्वरसाई म्हापसा) व स्वरचित आरतीसाठी विघ्नेश नाईक (ओम कलासृष्टी बांदोडा) यांना पारितोषिके मिळाली.
महिला गटातील स्पर्धेत द्वितीय पारितोषिक युवा कला मोगी, तळावली यांना तर तृतीय युवती आरती मंडळ अडकोण, बाणस्तारी यांना प्राप्त झाले. उत्तेजनार्थ प्रथम श्री साईगणेश महिला घुमट आरती मंडळ, म्हापसा, द्वितीय गणपती कला आणि सांस्कृतिक संघ तोर्ड, साल्वादोर दी मुंद व तृतीय कटमगाळ दादा पथक, फोंडा यांना देण्यात आले. उत्कृष्ट समुह गायन व उत्कृष्ट समुह घुमट वादनासाठी लईराई महिला घुमट आरती मंडळ, शिरगाव, उत्कृष्ट कासाळें वादन अश्निया अनिल तळकर (श्री शांतादुर्गा बोडगेश्वर महिला घुमाट आरती मंडळ, म्हापसा) उत्कृष्ट शामेळ वादनासाठी चेतना गावडे (सरस्वती कला मंडळ केळबाय, कुर्टी) तर स्वरचित आरतीसाठी कटमगाळ दादा पथक, फोंडा यांना पारितोषिक मिळाली.
बक्षीस वितरण सोहळय़ाला कला व संस्कृतीमंत्री तथा कला मंदिरचे अध्यक्ष गोविंद गावडे, फोंडय़ाचे आमदार व माजी मुख्यमंत्री रवी नाईक, कला मंदिरचे उपाध्यक्ष तथा नगराध्यक्ष शांताराम कोलवेकर, सदस्य सचिव स्वाती दळवी, संचालक प्रदीप नाईक, आयोजन समितीचे सर्वेंद्र फडते, महेश सतरकर, सर्वानंद कुर्पासकर, चेतन खेडेकर हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीश वेळगेकर यांनी तर स्वाती दळवी यांनी आभार मानले.