17 पैकी 10 जागावर दणदणीत विजय
कवठेमंकाळ/प्रतिनिधी
अख्ख्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय आर आर पाटील यांचे सुपुत्र युवा नेते रोहित पाटील यांनी 17 पैकी तब्बल दहा जागा जिंकत विरोधी भारतीय जनता पार्टीचे खासदार संजयकाका पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे, आणि जिल्हा बँकेच्या संचालिका श्रीमती अनिता सगरे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास आघाडीचा अक्षरशः धुव्वा उडवला. अतिशय चुरशीने झालेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादीला 10 शेतकरी विकास आघाडी ला 5 तर दोन जागांवर अपक्ष विजयी झाले आहेत.
निवडणुकीनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कवठेमंकाळ शहरामध्ये गुलालाची उधळण करत एकच जल्लोष केला. शेतकरी विकास आघाडी मधील विद्यमान नगरसेवक गजानन कोठावळे, बाळासाहेब पाटल आणि पॅनलचे नेते पांडुरंग पाटील यांच्या पत्नी आधी दिग्गज उमेदवारांचा धक्कादायक रित्या पराभव झाला.