एक कोटीच्या मालमत्तेची हानी : आगीमुळे शेजारच्या घरालाही धोका : घर की गोदाम?परवाना कोणी दिला? परप्रांतीयांच्या जोड धंद्याचे पंचायतपुरवितेलाड
प्रतिनिधी /फोंडा
ढवळी-फर्मागुडी बायपासजवळील धुमरे कवळे येथे एका गोदामवजा घराला अचानक भीषण आग लागून सुमारे 1 कोटी रूपये मालमत्तेची हानी झाली. काल रविवारी दुपारी दीड वाजण्याचा सुमारास सदर घटना उघडकीस आली. काही क्षणात आगीचे रौद्ररूप धारण केले. गोदामातील प्लास्टिक खुर्च्या आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्यामुळे आगीचे लोट हवेत पसरले होते. कोणतीही जिवीतहानी टळली असली तरी शेजारील घरालाही धोका निर्माण झाला आहे. घटनेच्या तब्बल अडीच तासानंतर हजर झालेल्या अग्निमशामक दलाने आग आटोक्यात आणून आग इतर घरात पोचण्यापासून रोखण्यात यश मिळवले. रात्री उशिरापर्यंत अग्निशामक दलाचे मदतकार्य सुरू होते.
सदर घटनेत मूळ राजस्थान येथील विरधरन बिष्णोई यांच्या मालकीचे घरवजा गोदाम पुर्णतः आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. शेजारील गोगटे नामक व्यक्तीच्या घरालाही धोका निर्माण झाला आहे. गोगटे यांच्या पहिल्या मजल्यावर आगीचे लोट पोचून त्यानाही झळ बसली. निवासी गाळय़ाच्या परिसरात गोदामवजा घरात मोठय़ा प्रमाणात प्लास्टिक खुर्च्या तळमजल्यावर व दुसऱया मजल्यावर साठविण्यात आल्या होत्या. तसेच तळमजल व दुसरा मजल्याच्या मधोमध बिष्णोई आपल्या अन्य सातजणासह राहत आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचा शोध अग्निशामक दल घेत आहे.
घर की गोदाम? परवाना मिळतोच कसा?
प्राप्त माहितीनुसार कवळे पंचायत क्षेत्रातील कापसन फार्मजवळील धुमरे येथील गोदामवजा घरात बिष्णोई नामक आपल्या इतर सात सदस्यासह पहिल्यामजल्यावर राहत आहे. तळमजला व दुसऱया मजल्यावर मोठया प्रमाणात प्लास्टिक खुर्च्या साठवून ठेवण्यात आल्या होत्या. तळमजल्यावर केरोसिन स्टोव्हचीही मोठया प्रमाणात साठवणूक करण्यात आली होती. सदर घटनेची माहिती फोंडा अग्निशामक दलाला सुमारे 4 वा. सुमारास मिळाली होती तोपर्यत बराच उशिर झाला होता.
अडचणीच्या ठिकाणी अरूंद रस्त्याच्या बाजूला डोंगरमाथ्यावर गोदामवजा घर असल्याने अग्निशामक दलाला मदतकार्य करताना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. बंदिस्त असलेल्या गोदामात कोणत्याच सुरक्षेच्या उपाययोजना नव्हत्या. आग प्रतिबंधक उपाययोजना नव्हती तसेच नेमक्या याचवेळी येथे काम करणारे कामगार बाजारहटीसाठी फेंडय़ात गेले होते अन्यथा एवढी मोठी दुर्घटना घडलीच नसती असे येथे जमलेले बिष्णोई यांचे नातेवाईक सांगत होते.
तीस बंबसह 1 हजार लिटर फोमचा वापर
फोंडा अग्निशामक दलाने फोंडा, कुंडई, पणजी, मडगांव, ओल्ड गोवा, वेर्णा, डिचोली, कुडचडे अग्निशामक दलाच्या मदतीने सुमारे 30 बंब आग विझविण्यासाठी वापरण्यात आले. तसेच आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे 1 हजार लिटर फोम अग्निशामक दलाला वापरावा लागला. आग पसरून जिवितहाती होऊ नये म्हणून सद्यपरिस्थितीत शेजारील घरातील गॅस सिलिंडर दुसरीकडे हलविण्यात आले आहे. तेथील रहिवांशाना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. मात्र गोदामवजा घरातील महत्वाची कागदपत्रासह इतर मौल्यवान वस्तूही आगीच बेचिराख झालेल्या आहेत. तसेच गोगटे परिवाराच्या महत्वाची कागदपत्रे घरात अडकल्यामुळे त्य़ांनीही चिंता व्यक्त केली आहे. पूर्ण इमारत आगीमुळे धोकादायक ठरलेली आहे.
अग्निशामक दलाचे संचालक नितीन रायकर घटनास्थळी दाखल झाले होते. त्याच्या मार्गदर्शनाखाली फोंडा विभागीय अधिकारी राजेंद्र हळदणकर, स्टेशन अधिकारी शैलेश गावस, सुशील मोरजकर, यशवंत गावस यांनी महत्वाचे मदतकार्य केले.
आमदार सुदिन ढवळीकर घटनास्थळी दाखल
आगीची वार्ता वाऱयासारखी पसरली तेव्हा आमदार सुदिन ढवळीकर घटनास्थळावर दाखल झाले. संपूर्ण घटनेचा आढावा घेतला. घरातील सदस्याच्या सुरक्षितेविषयी विचारपूस केली तसेच अग्निशामक दलाचे संचालक नितीन रायकर व स्थानिक युवकानी केलेल्या कामगिरीचे प्रशंसा केली.