कसबे डिग्रज / वार्ताहर
जुलै महिन्यात आलेल्या महापुरात कसबे डिग्रज मधील व्यावसायिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून मोजक्याच लोकांना मदत खात्यावर वर्ग करण्यात आली. परंतु यामध्ये अनेक पात्र लोकांना वंचित ठेवल्याचा आरोप करत व्यावसायिक संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
महापुरानंतर जवळपास सहाशेपेक्षा जास्त व्यवसायाचे पंचनामे करण्यात आले. परंतु यापैकी मोजक्याच लोकांना मदत जमा झाली आहे. मदत जमा झालेल्या व्यवसायिकांच्या मदतीतही मोठी तफावत आढळून येत असल्याने जाणीवपूर्वक चुकीचे पंचनामे करून व्यावसायिकांना मदतीपासून वंचित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी होत आहे. व्यवसायिकांचे पंचनामे करताना मोठ्या प्रमाणात दुजाभाव करून अनेक पात्र लोकांना अपात्र ठरवल्याने अन्याय झाल्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.