वेळ कमी असल्याने उडाली तारांबळ, गाठीभेटी होणेही बनले अवघड
प्रतिनिधी/ पणजी
जि. पं. निवडणूक मतदान अचानक व घाईने जाहीर करण्यात आल्यामुळे राजकीय पक्ष – त्यांचे उमेदवार यांची धावपळ उडाली असून जाहीर प्रचार नसला तरी त्यांनी घरोघरी गाठीभेटी घेण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. मतदारांनाही आपले उमेदवार कोण हे आठवावे लागत असल्याने या निवडणुकीत आता उमेदवार आणि मतदार या दोघांचीही कसोटी लागल्याचे चित्र दिसत आहे.
उमेदवारांकडे केवळ 5 दिवस शिल्लक असून त्या दिवसात सर्व मतदारांकडे पोहोचणे शक्य नाही अशी प्रतिक्रिया उमेदवार प्रकट करीत आहेत. कोरोना संकटामुळे 22 मार्च रोजी ठरलेली निवडणूक मतदान स्थगित करुन ते बेमुदत काळासाठी पुढे ढकलण्यात आले होते. मतदान केव्हा होणार याचा पत्ता उमेदवारांनाही नव्हता तथापि, अचानक मतदानाची तारीख घोषित करण्यात आल्यामुळे उमेदवारांची तारांबळ उडाली आहे. अशी अचानक तारीख जाहीर होईल याची कल्पना उमेदवारांना नव्हती. त्यामुळे त्यांनी आता घरोघरी प्रचार सुरु केला असून काल रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने बहुतेक उमेदवारांनी त्याचा लाभ घेऊन मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या.
पक्षीय पातळीवर होतेय निवडणूक

जि. पं. निवडणूक पक्षीय पातळीवर होणार असून त्यात भाजप, काँग्रेस मगो, आप या पक्षांनी आपले उमेदवार उतरवले आहेत. गोवा फॉरवर्ड या पक्षाचा अधिकृतपणे एकही उमेदवार या निवडणुकीत नाही. त्यांनी काही मतदारसंघात अपक्ष उमेदवारांना पाठिंबा दिला आहे, असे सांगण्यात आले.
राजकीय पक्ष, आमदारांची कसोटी
पक्षीय पातळीवर निवडणूक – मतदान होणार असल्याने पुन्हा एकदा पक्षीय राजकारण रंगणार आहे. कोरोनाचे गोव्यातील संकट अजून टळलेले नाही. त्यामुळे मतदान किती टक्के होते यावरही अनेक उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे. जो उमेदवार आपले जास्त मतदार घरातून बाहेर काढेल त्याला जिंकण्याची जास्त संधी आहे. सर्व राजकीय पक्षांनी त्यांचे समर्थक तसेच काही आमदारांनी त्यांचे समर्थक या निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे केले आहेत. त्यामुळे त्या राजकीय पक्षांची, मंत्री, आमदारांची देखील कसोटी लागणार आहे.
फोन, सोशियल मीडियावरुन प्रचार
गोव्यातील एकंदरित जनमत सावंत सरकार तसेच सत्ताधारी भाजप यांच्या बाजूने आहे की विरोधात याचा फैसला थोडय़ाफार प्रमाणात या जि. पं. निवडणुकीतून होणार आहे. सोशल मीडियाचा मोठा वापर करुन उमेदवारांनी मतदारांशी संपर्क साधले आणि त्यांना फोनवरुन मतदानासाठी याचना करणे हे काम जोमाने सुरु केले आहे.
कोरोनामुळे गर्दी करुन किंवा बैठका घेऊन प्रचाराला बंदी घालण्यात आली असली तरी एखाद्या घरात – लहान हॉलमध्ये, देवळात मतदारांना भेटण्यासाठी उमेदवारांनी प्रयत्न चालवले आहेत. तरुण मतदारांसाठी मोबाईलवरुन प्रचार करण्याचे सत्र उमेदवारांनी चालू केले आहे तर वृद्ध मतदारांना भेटून प्रचार सुरु केला आहे. भेटी-गाठीच्या प्रचारावर उमेदवारांनी भर दिला असून मतदारांनाही उमेदवारांचा विसर पडल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे ही निवडणूक म्हणजे सर्वांची कसोटी घेणार ठरणार आहे. मतदारांची या निवडणुकीत मोठी कसोटी लागणार असून 2022 च्या विधानसभा निवडणुकी अगोदर ही निवडणूक होत असल्याने तिला महत्त्व प्राप्त झाले आहे.