ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

दिग्विजय सिंह आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, माझ्या कोविड चाचणीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या मी माझ्या दिल्लीतील घरामध्ये क्वारंटाइन आहे. कृपया मागील काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी विलगिकरणात राहून आपल्या आरोग्याबाबत सर्व खबरदारी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.
दरम्यान, दिग्विजय यांच्या व्यतिरिक्त काँग्रेसमधील अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. दिग्विजय सिंह यांच्यापूर्वी आजच सकाळी काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाल यांना देखील कोरोनाची बाधा झाली आहे.
- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भयाण परिस्थिती
कोरोनाची दुसरी लाट जीवघेणी बनत चालली आहे. देशात मागील 24 तासात 1115 लोकांचा कोरोनाने जीव घेतला आहे. तर 2 लाखांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूमध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. त्यामुळे अधिक चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.