दीपक शिंदे – म्हैसाळक: शहर पोलिसांना निवेदन
सांगली/प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी उल्लेख करत विखारी विधान करणाऱ्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी भाजप शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे-म्हैसाळकर यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन त्यांनी सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना दिले आहे.
या निवेदनात, महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अत्यंत घृणास्पद आणि बेजबाबदार वक्तव्य केलेले आहे. त्यांनी पंतप्रधानांचा एकेरी उल्लेख करून “मी मोदीला मारू शकतो, मी मोदीला शिव्या देऊ शकतो” म्हणून घाबरून मोदी माझ्याविरोधात प्रचाराला आला नाही, अशा प्रकारचे अत्यंत विखारी विधान जाहीर रित्या केले आहे.
वस्तविक पंतप्रधान हे कोण्या एका पक्षाचे नसतात तर ते संपूर्ण देशाचे असतात. अशावेळी देशाच्या पंतप्रधान बद्दल जाहीरपणे त्यांना मारण्याची व शिव्या देण्याची भाषा वापरणे निंदनीय आहे. नाना पटोले यांचे विधान पोलिसांनी गंभीर रित्या घेणे गरजेचे आहे. पटोले यांच्या बेजबाबदार विधानाबद्दल आणि त्यांच्या एकंदरीत मोदी द्वेषाच्या मानसिकतेचा विचार करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे.