काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांची माहिती : भारतीय निवडणूक आयोगाने केले स्पष्ट : फुटिर आमदारांच्या अडचणीत वाढ
प्रतिनिधी / पणजी
काँग्रेस सोडून भाजपात दाखल झालेल्या दहा आमदारांनी गोवा काँग्रेस विधिमंडळ पक्ष भाजपात विलिन केल्याचा दावा सपशेल खोटा ठरला आहे. भारतीय निवडणूक आयोगाने तशा प्रकारची कोणतीही माहिती आयोगाकडे उपलब्ध नसल्याचे स्पष्ट केले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांना दिलेल्या उत्तरात तसे आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसून भाजपात दाखल झालेल्या दहा आमदारांचे भवितव्य आणखी बिकट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी भारतीय निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोग या दोन्ही ठिकाणी विलिनीकरणाबाबतची माहिती मागितली होती. कारण काँग्रेस पक्षाशी गद्दारी करून भाजपात दाखल झालेल्या दहा आमदारांच्या गटाने काँग्रेस भाजपात विलिन केल्याचा दावा केला होता. तशा प्रकारचे पत्र सभापतींना दिले होते. काँग्रेसकडे 15 आमदारांचे संख्याबळ त्यावेळी होते. पैकी 10 आमदार फुटून त्यांनी विलीनीकरणाचा दावा केला होता.
पक्षांतर प्रकरणाला मिळणार वेगळे वळण
18 जून 2020 रोजी गिरीश चोडणकर यांनी भारतीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिले होते. मान्यतापात्र राजकीय पक्ष व ज्या राजकीय पक्षांची मान्यता अद्याप कायम आहे त्यांची माहिती मागितली होती. तसेच इंडियन नॅशनल काँग्रेस विधिमंडळ पक्ष गोवा हा भाजपात विलिन करण्याबाबत अर्ज आला आहे का? अशीही विचारणा केली होती. तसेच भारतीय निवडणूक आयोगाने गोवा काँग्रेस विधिमंडळ पक्ष भाजपात विलिन करण्याबाबत मान्यता दिली आहे काय? याबाबत विचारणा केली होती. यासंदर्भात आयोगाकडे कोणतीही माहिती नाही व संपर्कही आला नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता या पक्षांतर प्रकरणाला वेगळे वळण येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
प्रकरण पोहोचले सर्वोच्च न्यायालयात
वर्षभरापूर्वी काँग्रेसला दगा देऊन दहा आमदारांनी भाजपात प्रवेश केला होता. तत्कालीन विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्या नेतृत्वाखाली हा दहा आमदारांचा गट काँग्रेसमधून फुटला होता. त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सभापती राजेश पाटणेकर यांच्यासमोर अपात्रता याचिका दाखल केली होती. या अपात्रता याचिकेवर दीर्घकाळ कारवाई होऊ न शकल्याने अखेर चोडणकर यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. 16 जून 2020 रोजी चोडणकर यांच्या याचिकेवर सुनावणी झाली. तात्काळ सभापतींना न्यायालयाने नोटीस बजावली. हे प्रकरण सध्या न्यायालयात असून नुकतीच न्यायालयात सुनावणी होऊन न्यायालयाने दोन आठवडय़ांची मुदत दिली आहे. त्यामुळे ऑगस्टच्या दुसऱया आठवडय़ात न्यायालयात पुढील सुनावणी होण्याची शक्यता आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीमुळे एक दमदार हत्यार सध्या काँग्रेसच्या हाती आले आहे. गोवा काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे भाजपात विलिनीकरण केल्याचा या दहा आमदारांचा दावा यामुळे खोटा ठरला आहे. सभापतींसमोर असलेल्या अपात्रता याचिका प्रकरणात आता काँग्रेस पक्षाची बाजू भक्कम बनली आहे.
महत्वाचे म्हणजे काँग्रेस विधिमंडळ पक्ष भाजपात विसर्जित केल्याचा दावा करून भाजपात गेलेल्या आमदारांनी मंत्रिपदे व अन्य महामंडळांची पदे मिळविली आहेत. केवळ एक मोठा काँग्रेसमधील गट फुटून भाजपात दाखल झाला अशी दावेदारी करणे वेगळे आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या विसर्जनाची दावेदारी करणे वेगळे. त्यामुळे राजकीयदृष्टय़ा आणि लोकशाहीच्या दृष्टीनेही भारतीय निवडणूक आयोगाने गिरीश चोडणकर यांना पुरविलेली माहिती महत्वपूर्ण ठरू शकते.
काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाचा अर्जही नाही
याअगोदर सेव्ह गोवा पक्षाचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण केले होते. त्याबाबतची सर्व माहिती निवडणूक आयोगाकडे आहे, मात्र गोवा काँग्रेस विधिमंडळ पक्ष भाजपात विलिन केल्याचा दावा 10 आमदारांनी केला असला तरी त्याबाबत निवडणूक आयोगाकडे कोणतीही माहिती नाही. दावा केलेल्या 10 आमदारांना भाजपात जाऊन वर्ष उलटले तरी त्यांच्या दाव्यानुसार गोवा काँग्रेस विधिमंडळ पक्ष भाजपात विलिन झालेला नाही किंवा त्याबाबतचा अर्जही भारतीय निवडणूक आयोगाकडे केलेला नाही.