प्रतिनिधी /मडगाव
संपूर्ण राज्यात काणकोण तालुक्यात मूत्रपिंडाचे आजार हे सर्वाधिक आहेत. काणकोणामध्ये आजाराचे प्रमाण जास्त का यावर आजवर अनेक संशोधने झाली. पण, ठोस असे उत्तर मिळालेले नाही. मात्र, शुद्ध पाण्याअभावी मूत्रपिंड निकामी होत असल्याचा निषर्कश काढला जात आहे. या पार्श्वभूमीवर आत्ता खासदार निधीतून शुद्ध पाणी पुरविण्यासाठी आपण प्रयत्न करीत असल्याची माहिती दक्षिण गोव्याचे खा. फ्रान्सिस सार्दिन यांनी दिली.
खासदार निधीचा वापर करणाऱया सरकारच्या एकूण 14 खात्यांची आढावा बैठक काल खा. सार्दिन यांनी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली. या बैठकीनंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. काणकोणात मूत्रपिंडाची समस्या गंभीर असून त्या ठिकाणी शुद्ध पाणी पुरविण्यासाठी आपण अधिकाऱयांना लक्ष केंद्रीत करण्यास सांगितल्याची माहिती खा. सार्दिन यांनी दिली. सद्या होत असलेल्या पाणी पुरवठय़ात जिवाणू व अन्य घातक पदार्थ असावे अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. जर लोकांना शुद्ध पाणी मिळाले तर मूत्रपिंडाची समस्या निकालात निघू शकते असे खा. सार्दिन म्हणाले.
पाणी पुरवठा करणाऱया जलवाहिनीलाच एक मशिन बसवून त्याद्वारे पाणी शुद्ध करण्याचा प्रस्ताव असून खासदार निधीतून यावर 30 ते 40 लाख रूपये खर्च करण्याची आपली तयारी असल्याचे खा. सार्दिन म्हणाले. या संदर्भात एका डॉक्टरानेच आपल्याला माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले.
किनारपट्टी भागात सीसीटीव्ही कॅमेरा
दक्षिण गोव्याच्या कोलवा, बाणावली व केळशी समुद्रकिनाऱयावर सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात आले असून आगामी पर्यटन हंगामापूर्वी त्यांची तपासणी केली जाणार असल्याची माहिती यावेळी दिली. काही सीसीटीव्ही कॅमेरा वादळामुळे नादुरूस्त झाले होते. त्याची दुरूस्ती करण्यात आली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱयांची देखभाल करण्याची जबाबदारी एका एजन्सीवर देण्यात आली आहे.
रस्त्यासाठीचे 8 कोटी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे
रस्त्यासाठी खासदार निधीतून 8 कोटी रूपये मिळाले होते. मात्र, हा निधी ग्रामीण विकास एजन्सीला वापरता आला नाही. त्यामुळे तो सरकारने सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वळविला. हा निधी तेथेच पडून आहे. त्याचा पुन्हा ग्रामीण विकास एजन्सीद्वारे वापर करणे शक्य आहे का ? याचा अभ्यास करण्यास आपण अधिकाऱयांना सांगितल्याची माहिती खा. सार्दिन यांनी दिली.
खासदार निधीतून राशोल येथे भूमिगत वीज वाहिन्या टाकण्याचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र, त्या ठिकाणी सद्या खोदकाम केल्यास पाणी लागते. त्यामुळे हे काम नोव्हेंबर-डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याचा आदेश अधिकाऱयांना दिला आहे.
खोला येथे नेत्रचिकित्सा शिबीर
मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्यानंतर लेन्स बसविण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रत्येकी 600 रूपये मिळतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी खोला येथे नेत्रचिकित्सा शिबीर घेतले जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या योजनेचा अनेक लोकांना लाभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
14 पैकी 2 खाती अकार्यक्षम
खासदार निधीचा वापर करणाऱया सरकारच्या 14 पैकी 2 खात्याचा कारभार समाधानकारक नसल्याची माहिती यावेळी खा. सार्दिन यांनी दिली. त्यांना दिलेले टार्गेट त्यांनी पूर्ण केलेले नाही. ते पूर्ण करण्यासाठी अधिकाऱयांना दोन महिन्याची मुदत देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या आढावा बैठकीला दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी रूचिका कटयाल व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी देविदास गांवकर उपस्थित होते.