प्रतिनिधी/ काणकोण
कोरोना महामारीचा वाढता आलेख रोखण्यासाठी जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या दुसऱया दिवशीही काणकोण तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळाला. या तालुक्यातील किराणामालाची दुकाने, औषधालये, कदंब बससेवा, भाजी आणि मासळी मार्केट अंशतः चालू असले, तरी बाजारात लोक फारसे नसल्यामुळे सर्वत्र शुकशुकाट जाणवत होता. कामगार दिनाच्या सुट्टीमुळे गोवा बागायतदार भवन, बँका, पतसंस्था बंद होत्या.
खासगी बससेवा दुसऱया दिवशीही पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे कदंब बसस्थानकावर नेहमीची गर्दी दिसत नव्हती. पोलिसांचा सर्वत्र कडक पहारा होता. लोक बऱयाच प्रमाणात सध्या घाबरलेले असून विनाकारण बाजारात किंवा अन्यत्र गर्दी करण्यापासून दूर राहत असल्याचे दिसत आहे. या लॉकडाऊनमुळे या तालुक्यातील बऱयाच जणांनी आपली नियोजित लग्नकार्ये पुढे ढकलली आहेत, तर काही ठिकाणी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत लग्नसोहळे झाले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
काणकोणच्या सामाजिक आरोग्य केंद्रात मात्र कोविड प्रतिबंधक लसीसाठी आणि कोविड चाचणीसाठी 150 पेक्षा अधिक लोकांची गर्दी होती. कामगार दिनामुळे संध्याकाळच्या सत्रात कोविड प्रतिबंधक लसीकरण आणि चाचणी बंद ठेवण्यात आली होती. आज रविवारीही चाचणी आणि लसीकरण कार्यक्रम चालू असेल, अशी माहिती डॉ. दिवाकरजी वेळीप यांनी दिली.