पालिकेचे 28 वे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षपदी अमिता पागी, भाजपमध्ये फूट, आपला गट भाजपाचाच : रिबेलो
प्रतिनिधी / काणकोण
काणकोण पालिकेच्या नगराध्यक्षपदी सायमन रिबेलो आणि उपनगराध्यक्षपदी अमिता पागी यांची गुरुवारी 7 वि. 5 मते अशा फरकाने निवड झाली. रिबेलो हे या पालिकेचे 28 वे नगराध्यक्ष बनले आहेत. विरोधी गटातर्फे निवडणुकीत उतरलेल्या धीरज उर्फ पांडुरंग गावकर आणि सुप्रिया देसाई यांना प्रत्येकी 5 मते मिळाली. निर्वाचन अधिकारी म्हणून रोहित कदम यांनी काम पाहिले व त्यांना काणकोण पालिकेचे मुख्याधिकारी उदय प्रभुदेसाई यांनी सहकार्य केले. रिबेलो हे या पालिकेचे दुसऱयांदा नगराध्यक्ष बनले आहेत. या एकंदर प्रकारामुळे काणकोण पालिकेत भाजपमध्ये उभी फूट पडली असल्याचे दिसून आले आहे.
एकूण 12 सदस्यांच्या या पालिकेत सायमन रिबेलो यांच्या बाजूने रमाकांत गावकर, सारा देसाई, गंधेश मडगावकर, लक्ष्मण पागी, नारसिस्को फर्नांडिस व अमिता पागी हे एकसंध राहिले. मतमोजणीच्या दिवशी निकाल जाहीर झाल्यानंतर 12 ही सदस्य भाजप गटाचे असल्याचे उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांनी जाहीर केल्यानंतर सर्वांनी मुख्यमंत्री आणि पक्षाध्यक्षांची भेट घेतली होती. मात्र लगेच फूट पडून रिबेलो यांनी अन्य 6 जणांना घेऊन वेगळा गट केला अणि पाच वर्षांसाठी नगराध्यक्षपद वाटून घेऊन ते मोकळे झाले.
तर धीरज गावकर, सुप्रिया देसाई, शुभम कोमरपंत, हेमंत गावकर आणि नीतू देसाई या पाच जणांनी स्वतंत्र गट बनविला. त्यातच नीतू देसाई या काणकोण भाजप मंडळाच्या सचिव असून मुख्यमंत्री तसेच पक्षाध्यक्षांच्या आदेशानुसारच धीरज गावकर आणि सुप्रिया देसाई यांनी अर्ज दाखल केला होता, अशी माहिती माजी नगराध्यक्ष समीर देसाई यांनी दिली आणि या एकंदर प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर सगळा अहवाल पक्षश्ा़खsष्ठींसमोर सादर करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आपला गट भाजपाचाच : रिबेलो
दोन्ही गटांनी आपण भाजपाचेच असल्याचा दावा करून निवडणुकीत भाग घेतला. त्यात रिबेलो गटाचा विजय झाला. आपला गट हा भाजपाचा गट असून लगेच आपण तसेच आपल्या गटाचे नगरसेवक उपसभापती फर्नांडिस, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पक्षाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांची भेट घेणार असल्याचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष रिबेलो यांनी घोषित केले. यात माजी मंत्री रमेश तवडकर, चेतन देसाई यांचा हात आहे की नाही हे मात्र अजून उघड झालेले नाही.
रेंगाळलेल्या कामांना प्रथम चालना देणार
आपला गट एकसंध असून काणकोण पालिकेतील रेंगाळलेल्या कामांना प्रथम चालना देणार आहे. त्यात चावडीवरील मासळी मार्केट, पाळोळे येथील पार्किंग समस्या यांना प्राधान्य देणार आहे. निवडणुकीपुरत्या तात्पुरता अलिप्त झालेल्या गटातील नगरसेवकांना बरोबर घेऊन काणकोण पालिकेच्या विकासकामांकडे लक्ष दिले जाईल. या पालिकेच्या नवीन कार्यालय इमारत बांधकामाचे सोपस्कार पूर्ण करून हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याकडे आपण लक्ष देणार आहे, असे रिबेलो यांनी स्पष्ट केले. मात्र विकासकामांसाठी सरकारचा पाठिंबा महत्त्वाचा असून याकामी आपण नेहमी आमदार फर्नांडिस यांचे सहकार्य घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांची 7 वि. 5 अशी निवड झाल्यानंतर धीरज गावकर आणि इतरांनी नगराध्यक्षांच्या चेंबरमधून काढता पाय घेतला. मात्र नगर्से वॉर्डाचे नगरसेवक हेमंत गावकर, माजी नगराध्यक्ष राजेंद्र देसाई, अजय भगत, माजी उपनगराध्यक्ष किशोर शेट, माजी मंत्री रमेश तवडकर, काणकोण भाजप मंडळाचे अध्यक्ष नंदीप भगत, विशाल देसाई, काँग्रेसचे सचिव महादेव देसाई, शांबा देसाई तसेच पाळोळे, किंदळे, किंदळेबाग, चावडी, देवाबाग वॉर्डातील असंख्य समर्थकांनी गर्दी करतानाच हारतुऱयांसहित नवीन नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांचे अभिनंदन केले.
शेवटपर्यंत रिबेलो यांनाच पाठिंबा : लक्ष्मण पागी
नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांची निवड बिनविरोध होणार अशी परिस्थिती सुरुवातीला होती. मात्र धीरज गावकर आणि सुप्रिया देसाई या दोघांचे अर्ज आल्यानंतर नेमकी काय परिस्थिती होईल अशी धाकधूक सर्वांनाच होती. आपल्यावर तर अनेक प्रकारचे दबाव आले होते. आपण भाजपाचा कट्टर कार्यकर्ता असून नेहमीच आपण तवडकर यांच्यासाठी काम केलेले आहे. मात्र यावेळी आपला शेवटपर्यंत सायमन रिबेलो यांनाच पाठिंबा असेल, असे पाळोळे वॉर्डाचे नगरसेवक लक्ष्मण पागी यांनी जाहीर केले आहे. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांच्या निवडीपूर्वी नवनिर्वाचित सदस्यांना शपथ देण्यात आली. ही शपथ कदम यांनी दिली. रिबेलो यांनी कोकणीतून, तर धीरज गावकर, हेमंत गावकर, नीतू देसाई, लक्ष्मण पागी, गंधेश मडगावकर, रमाकांत गावकर, अमिता पागी यांनी मराठीतून व इतरांनी इंग्रजीतून शपथ घेतली. नगराध्यक्षांच्या चेंबरमध्ये मतदान पेटी ठेवण्यात आली होती. दोन्ही गटांना नियमानुसार अर्ज मागे घेण्यासंबंधी अवधी देण्यात आला आणि 15 मिनिटांच्या फरकाने दोन्ही पदांसाठी मतदान घेण्यात आले. लगेच कदम यांनी निकाल जाहीर केला. दरम्यान, नवनिर्वाचित नगराध्यक्ष रिबेलो, उपनगराध्यक्षा पागी आणि इतर सर्व नगरसेवकांनी संध्याकाळी मुख्यमंत्री तसेच पक्षाध्यक्ष आणि उपसभापती फर्नांडिस यांची भेट घेतली.