प्रतिनिधी / म्हापसा
मुंबईहून वेर्ला-काणका येथे दाखल झालेल्या तिघाजणांना कोरोना संसर्गाची लागण झाल्याच्या बातमीने काल मंगळवारी काणका भागात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. सकाळच्या ट्रू नेट चाचणीत त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता, मात्र नंतर व्हायरोलॉजीतील चाचणीत अहवाल निगेटिव्ह आला.
दोन दिवसापूर्वी मुंबईहून गाडीने हे कुटुंब काणका येथे आपल्या पाहुण्यांच्या घरी राहायला आले होते. एका कुटुंबात कोरोनाची लक्षणे असल्याची माहिती उघड झाल्यानंतर आरोग्य खात्याचे कर्मचारी त्यांना शोधत होते. पत्ता सारखा न दिल्याने ते मिळणे कठीण झाले होते. वेर्ला काणकाचे सरंपच मिल्टन मार्किस व इतरांनी त्या कुटुंबाचे घर शोधून काढण्यास मदत केली. हे कुटुंब मिळाल्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली. त्यांना व त्यांच्या संपर्कात होते त्यांना त्वरित म्हापसा जिल्हा आझिलो इस्पितळात पाठविले. तिथे त्यांची चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली. नंतर सायंकाळी व्हायरोलॉजीमध्ये चाचणी करण्यात आली असता, ती निगेटिव्ह आल्याची माहिती देण्यात आली आहे.