कातळखोद चित्र शोधकर्त्यांसोबतच्या बैठकीतील चर्चा
प्रतिनिधी/ रत्नागिरी
लवकरच सदर ठिकाणी प्रत्यक्ष भेट देण्याची इच्छा व्यक्त करीत रत्नागिरी मध्ये खोद चित्र प्रत्यक्ष पहाण्यासाठी आणि चाललेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी नियोजन करण्याबाबत सूचना आपल्या सहकायांना दिल्या. डिसेंबर 2020 मध्ये ही भेट अपेक्षित असल्याचे सांगितले जात आहे.
कोकणातील कातळ खोद चित्र आज अनेकांच्या आकर्षणाचा विषय बनला आहे . या खोद चित्रांचे शोध कर्ते सुधीर रिसबुड, धनंजय मराठे आणि डॉ सुरेंद्र ठाकुरदेसाई यांची कोकणातील या अमूल्य सांस्कृतिक ठेव्याचे जतन संवर्धन व्हावे म्हणून स्वखर्चाने धडपड चालू आहे. या विषया संदर्भात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना माहिती मिळाली आणि लगेचच त्यांनी भेटीचे निमंत्रण दिले. दृकश्राव्य व प्रिंट मीडिया माध्यमातून कोकणातील कातळशिल्प या बाबत वाचून होतो , पाहिले आहे त्यातूनच अधिक जाणून घेण्याची इच्छा अगोदर पासून होती असे राज ठाकरे यांनी त्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये सांगितले.
जवळपास तासभर झालेल्या बैठकीमध्ये शोधकर्ते सुधीर रिसबुड , धनंजय मराठे यांनी कोकणातील कातळ खोद चित्र रचनां बाबत सविस्तर माहिती विषद केली. , कातळशिल्प संरक्षण संवर्धन बाबत शासन प्रशासन पातळीवर चाललेल्या कामाची माहिती दिली. तसेच व्यक्तिगत पातळीवर आणि निसर्गयात्री संस्था, रत्नागिरीच्या माध्यमातून ऐतिहासिक , प्रागैतिहासिक तसेच जैवविविधतचे संरक्षण संवर्धन त्याला पर्यटन क्षेत्राची जोड देत शास्वत पर्यटन विकास आणि स्थानिक रोजगार निर्मिती साठी हाती घेतलेल्या कार्याची माहिती दिली. त्याचप्रमाणे कोकणातील एकंदर पर्यटन विकास याबाबत देखील चर्चा झाली.
विचारांच्या आदान प्रदानामध्ये काही मौलिक बाबी राज ठाकरे यांनी मांडल्या. कला प्रेमी राज ठाकरे यांनी एकंदर चाललेल्या कामाचे कौतुक केले. लवकरच त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. रत्नागिरी मध्ये खोद चित्र प्रत्यक्ष पहाण्यासाठी आणि चाललेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी नियोजन करण्याबाबत सूचना आपल्या सहकाऱयांना दिल्या आहेत. डिसेंबर 2020मध्ये ही भेट अपेक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. राज ठाकरे यांची भेट होण्यासाठी पुढाकार घेणारे इंफिगो आय केअर सेंटरचे संचालक डॉ श्रीधर ठाकुरदेसाई, धनंजय पराडकर, रत्नागिरी पर्यटन विकासासाठी सदैव धडपडणारे आणि खोद चित्र शोधकर्त्यांच्या पाठीशी उभे असणारे हर्षा हॉलिडेज, रत्नागरीचे सुहास ठाकुरदेसाई व कौस्तुभ सावंत, वास्तू विशारद मकरंद केसरकर ही मंडळी भेटी वेळी उपस्थित होती.