महापौर उदय मडकईकर यांची माहिती,कार्निव्हल चित्ररथ प्रमुखांची 12 रोजी बैठक

प्रतिनिधी / पणजी
पणजीत गोवा सरकारच्या पर्यटन खात्यातर्फे दि. 13 रोजी कार्निव्हल महोत्सव आयोजित करण्यात आला असून पणजी मनपा यात सहभागी होणार आहे. कार्निव्हल मिरवणूकसाठीचा मार्गावर वाद निर्माण झाला होता. परंतु आता त्या वादावर तोडगा काढण्यात आला असून कार्निव्हल मिरवणूक जुन्या मार्गानेच म्हणजेच दिवजा सर्कल ते कलाअकादमीपर्यंत या मार्गाने निघणार आहे. जुन्या सचिवालयासमोर मंडप घालण्याची तयारी केली जात आहे. तसेच मंडपात बसून मिरवणूक पाहण्याकरिता 50 टक्के लोकांनाच प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती महापौर उदय मडकईकर यांनी पणजीत पत्रकारांशी बोलताना दिली. कोरोना काळ असल्याने कार्निव्हलचे आयोजन करू नये यासाठी पणजी मनपावर टीकाही करण्यात आली होती. परंतु व्यावसायिक समुदायाचे तसेच पर्यटक कार्निव्हलसाठी भरपूर प्रमाणात येतात. पर्यटकांसाठी कार्निव्हल महोत्सव एक आकर्षण आहे. यामुळे गोव्यातील पर्यटन व्यवसायालाही एक नवीन उभारी मिळेल. यासाठी कार्निव्हल महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. लोकांनी मास्क घालून शक्य तो शारीरिक अंतर पाळणे आवश्यक आहे. कार्निव्हल महोत्सव 3.30 वा. सुरू होणार आहे. कार्निव्हलमध्ये चित्ररथ घेऊन सहभागी होणाऱयांची बैठक दि. 12 रोजी मनपा सभागृहात होणार आहे. यंदा मनपाचा चित्ररथ नसणार. सांबा स्क्वेअरमध्ये चार दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच यावर्षी मनपाचा चित्ररथ नसणार अशी माहिती पणजीचे महापौर उदय मडकईकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
कार्निव्हलची राज्यात धूम
राज्यात 13 व 14 रोजी कार्निव्हल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून शनिवारपासून किंग मोमोची राजवट सुरू होणार आहे. यंदा पणजी व मडगाव या दोन शहरात कार्निव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. पणजीत दि. 13 रोजी दयानंद बांदोडकर महामार्गावरील दिवजा सर्कल ते कला अकादमी या रस्त्यावर कार्निव्हल मिरवणूक होणार असून या मार्गावर सजावटीच्या कामाला सुरूवात झाली आहे. यंदा सिक्सटस एरिक डायस हे केग मोमो असणार आहे. डायस हे कांदोळी येथील बॉम सक्सेसो बार ऍण्ड रेस्टॉरंटचे मालक आहेत.
कोरोनाचा काळ असल्यामुळे आयोजनात मर्यादा आणली आहे. लोकांनी ही मिरवणूक चांगल्या प्रकारे पहायला मिळावा यासाठी जुन्या सचिवालयासमोर मंडप घालायला सुरूवात झाली आहे. योग्य प्रकारे महोत्सव व्हावा यासाठी पोलिसांची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच कार्निव्हलचे मास्क, चित्ररथ, तसेच इतर सजावटीच्या कामाला प्रारंभ झाला आहे.
कोरोना काळात कार्निव्हलचे आयोजन योग्य नाही. परंतु कार्निव्हलमधून कोरोनावर मात करण्याचा विजय तसेच आनंद व्यक्त करण्यात येणार आहे. पर्यटकांनी तसेच स्थानिकांनी महोत्सवात तसेच मिरवणूकीदरम्यान सर्व कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करा आणि जबाबदार बना असा असा संदेश यंदाचे किंग मोमो सिक्सटस एरिक डायस यांनी सांगितले.