राष्ट्रीय महामार्गावरील गडहिंग्लज बायपासवर दुर्घटना : प्राध्यापकांची पत्नी जखमी : संकेश्वर पोलिसात घटनेची नोंद
प्रतिनिधी / बेळगाव

भरधाव मारुती स्वीफ्ट कारवरील नियंत्रण सुटल्याने कार पुलावरून खाली कोसळून एकजण ठार तर महिला जखमी झाल्याची घटना पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील गडहिंग्लज बायपास पुलावर शुक्रवार 30 रोजी पहाटे घडली. निपाणीहून बेळगावकडे जात असताना हा अपघात घडला. अनिलकुमार राजाराम चव्हाण (वय 50, रा. समर्थ कॉलनी लक्ष्मीनगर, हिंडलगा, बेळगाव) असे मृताचे नाव तर शुभांगी अनिलकुमार चव्हाण (वय 42) असे जखमीचे नाव आहे. अनिलकुमार हे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांची पत्नी शुभांगी यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शुक्रवारी अनिलकुमार व शुभांगी चव्हाण हे दाम्पत्य कामानिमित्त बेळगावहून निपाणीकडे गेले होते. आपले काम आटोपून ते माघारी परतत होते. दरम्यान, त्यांची कार गडहिंग्लज बायपास पुलावर आली असता भरधाव कारवरील अनिलकुमार यांचे नियंत्रण सुटल्याने कार पुलावरून खाली कोसळली. यात अनिलकुमार गंभीर जखमी झाले तर शुभांगी या जखमी झाल्या. कार ब्रिजवरून खाली कोसळल्यानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर याची माहिती संकेश्वर पोलिसांना देण्यात आली. संकेश्वरचे पीएसआय गणपती कोगनोळी व सहकाऱयांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर जखमींना बाहेर काढून रुग्णवाहिकेतून संकेश्वर शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून बेळगाव केएलई रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना अनिलकुमार यांचा रात्री 8 वाजता मृत्यू झाला. तर शुभांगी यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची फिर्याद ऋषिकेश चव्हाण यांनी संकेश्वर पोलिसात दिली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.