पंतप्रधान मोदींच्या हस्ते कार्यक्रम, जनतेत मोठा उत्साह
वाराणसी / वृत्तसंस्था
उत्तर प्रदेश सरकारचा महत्वाकांक्षी आणि लोकोपयोगी काशी विश्वनाथ मार्गिका प्रकल्पाचे उद्घाटन आज सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. भव्य स्वरुपात हा कार्यक्रम होणार असून जनतेमध्येही मोठा उत्साह दिसून येत आहे. या मार्गिकेमुळे (कॉरिडॉर) या जगप्रसिद्ध ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळाच्या पर्यटनाला मोठे प्रोत्साहन मिळणार आहे.
वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिराच्या भोवतालच्या प्रदेशात ही मार्गिका निर्माण करण्यात आली असून ती या शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. येथील प्रसिद्ध दशाश्वमेध घाटही या मार्गिकेत समाविष्ट करण्यात आला आहे. या प्रकल्पाची द्वारे आणि इतर महत्वाच्या वास्तू रचना पारंपरिक पद्धतीने कोरीव दगडांमध्ये बांधण्यात आल्या आहेत. त्यामुळे ही मार्गिका पारंपरिक हस्तकला आणि आधुनिकता यांचा सुरेख संगम असल्याचे मत व्यक्त होत आहे.
स्थानिकांमध्ये उत्साह
या प्रकल्पाच्या उद्घाटन आणि राष्ट्रार्पण कार्यक्रमासंदर्भात वाराणसीवासियांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. प्रकल्पामुळे पर्यटनाप्रमाणेच स्थानिकांच्या उद्योगधंद्यांनाही मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. कार्यक्रमासाठी कडक पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.
लोकांचा ओघ शहराकडे
आज सोमवारच्या या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी उत्तर प्रदेशच्या इतर भागांमधून मोठय़ा प्रमाणात लोकांचा ओघ वारणसीकडे सुरु झाला आहे. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच साधुसंत आणि भाविकही येत आहेत. मंत्रजागराला आतापासूनच प्रारंभ झाला असून लोकांच्या चर्चेचा हाच विषय बनला आहे.
पंतप्रधान मोदींचे कार्यक्रम
पंतप्रधान मोदी दुपारी 1 वाजता काशी विश्वनाथ मंदिरात पोहचतील. त्यानंतर ते ‘काशी विश्वनाथ धाम’ प्रकल्पाच्या पहिल्या भागाचे उद्घाटन करतील. हा भाग 339 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला आहे. त्यानंतर ते गंगामातेचे दर्शन घेऊन संध्याकाळी गंगेची आरती करतील. काशी विश्वनाथाच्या भक्तांना आतापर्यंत मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी बऱयाच अडचणींना तोंड द्यावे लागत होते. मात्र, या मार्गिका प्रकल्पामुळे मार्ग प्रशस्त झाल्याने वाहतुकीची समस्या दूर झाली आहे.
शहरभर सजावट
या प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळय़ासाठी पूर्ण वाराणसी शहर सजविण्यात आले आहे. या सजावटीत प्रशासनाप्रमाणे स्थानिक नागरिकांनीही स्वतःहून सहभाग घेतला आहे. मार्गिकेवरील सर्व वास्तूंना एकाच गुलाबी रंगामध्ये रंगविण्यात आले असून दिव्यांच्या माळा आणि फुलझाडांचीही सजावट करण्यात आली आहे.
पंतप्रधान मोदींचा पुढाकार
हा प्रकल्प साकारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुढाकार कारणीभूत आहे. प्रकल्पाच्या प्रत्येक टप्प्याची माहिती ते घेत होते. काशी विश्वनाथ मंदिराभोवतीच्या 300 हून अधिक मालमत्ता आणि भूखंड या प्रकल्पासाठी खरेदी करण्यात आले होते किंवा अधिग्रहीत करण्यात आले होते. येथील 1400 हून अधिक दुकानदार, भाडेकरू आणि घरांचे अत्यंत सामोपचाराने पुनर्वसन करण्यात आले होते.
पाच लाख चौरस फुटांचा विस्तार
या प्रकल्पाचा विस्तार 5 लाख चौरस फुटांमध्ये झाला आहे. आधीच्या योजनेनुसार तो केवळ 3,000 चौरस फुटांपर्यंतच मर्यादित होता. तथापि, लोकांनी उत्स्फूर्त सहकार्य केल्याने तो इतक्या मोठय़ा प्रमाणात साकार झाला. या प्रकल्पाची निर्मिती निर्धारित वेळेआधीच करण्यात आली. त्यामुळे खर्चाच्या दृष्टीनेही तो यशस्वी ठरला. प्रकल्पाच्या 70 टक्के भूमीवर वृक्षारोपण करुन तो हरितप्रदेश करण्यात येणार असल्याचे असल्याचे प्रशासनाने दिलेल्या माहितीत स्पष्ट करण्यात आले आहे. एकंदर हा प्रकल्प नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरला आहे.
देशभरात कुतूहल
ड काशी विश्वनाथ प्रकल्पासंबंधी देशभरात नागरिकांना कुतूहल
ड पारंपरिकता आणि आधुनिकता यांचा या प्रकल्पामध्ये समन्वय
ड आज सोमवारी दुपारी 1 वाजता प्रकल्पाचे भव्यतापूर्ण उद्घाटन
ड कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी वाराणसीकडे नागरिकांची रीघ