वार्ताहर / कुदनूर
किटवाड (ता. चंदगड) येथे लघु पाटबंधारा तलावात बुडून बेळगावच्या तरुणाचा मृत्यू झाला. अभिषेक सज्जन (वय २५, रा. माळमारुती-श्रीनगर परिसर, बेळगाव) असे बुडालेल्या तरुणाचे नांव असून, मृतदेह पाण्याबाहेर काढण्यासाठी शोध सुरू आहे. सदर घटना रविवार दि. २० रोजी दुपारी २.३० च्या सुमारास घटली आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, अभिषेक हा तरुण रविवार सुट्टीनिमित्त पर्यटनासाठी किटवाड येथील धबधब्याकडे कुटुंबियांसह आला होता. किटवाड धबधबा हा कालकुंद्रीकडील लघु पाटबंधारा तलाव क्र. १ मधून ओव्हरफ्लो होणार्या पाण्यातून निर्माण झाला आहे. सध्या तलावातून पाणी ओव्हरफ्लो होत नसल्यामुळे धबधबा म्हणावा तसा प्रवाहित होत नाही. मात्र, परिसराचे निसर्ग सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करत असल्यामुळे पर्यटकांची किटवाडकडील रिघ सुरूच आहे.
रविवार असल्यामुळे अभिषेकचे कुटुंबियही धबधब्यासह परिसरात दाखल झाले होते, व परिसराच्या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत होते. अशातच अभिषेकला कालकुंद्रीकडील असलेल्या लघु पाटबंधारे तलावाच्या पाण्यात उतरण्याचा मोह झाला. तलावात सुमारे ५० फुटावर आत गेल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्यामुळे आणि पोहता न आल्याने अभिषेक पाण्यात बुडाला. दुपारी २.३० च्या सुमारास ही घटना घडली. तो पाण्यात बुडाल्याचे समजताच त्याच्या कुटुंबियांनी एकच हंबरडा फोडला.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ तसेच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह शोधन्यासाठी बचाव पथकालाही पाचारण करण्यात आले. तलावाच्या पाण्याची खोली अधिक असल्याने मृतदेह शोधण्यात बचाव पथकाला यश आले नाही. सायंकाळ झाल्यामुळे बचाव कार्य थांबविण्यात आले असून, सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू केली जाणार आहे. मात्र, सायंकाळी नागनवाडी येथील इसमाला पाण्यातील मृतदेह काढण्यासाठी पाचारण करण्यात आले होते. त्याच्या साहाय्याने मृतदेह शोधण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. अद्याप घटनेची नोंद पोलिसात झाली नाही. अभिषेकच्या पश्चात आई, वडील व बहिण असा परिवार आहे.