ऑनलाईन टीम / पुणे :
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना संचेती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. पुणे महापालिकेत शिवसैनिकांकडून धक्काबुक्की झाल्यानंतर ते पायऱ्यांवर कोसळले होते. त्यांच्या माकडहाडाला मुका मार लागला होता. आज त्यांना डिस्चार्ज मिळाला असून, ते दुपारी एक वाजेपर्यंत घरी पोहचणार आहेत.
किरीट सोमय्या यांनी रुग्णालयातून बाहेर पडतानाचे फोटो ट्विट करत म्हटले आहे की, पुण्यातील संचेती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. पुणे महापालिकेत जाऊन संजय राऊत यांचे कौटुंबिक भागीदार सुजीत पाटकर यांच्या लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस विरुद्ध कोविड सेंटर्स घोटाळय़ांबाबत तक्रार दाखल केली. शिवसेना आणि उद्धव ठाकर यांचे माफिया, मला ठाकरे सरकारच्या घोटाळय़ांचा पर्दाफाश करण्यापासून रोखू शकत नाहीत.
शनिवारी कोविड सेंटरच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत यासंदर्भातील चर्चेसाठी किरीट सोमय्या हे पुणे महापालिकेत आले होते. मात्र यावेळी पुणे महापालिकेत झालेल्या भ्रष्टाचाराचे निवेदन स्वीकारावे, अशी मागणी करत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची वाट अडवली. यावेळी शिवसैनिकांसोबत झालेल्या झटापटीत सोमय्या हे पायऱ्यांवर कोसळले. त्यावेळी त्यांच्या माकडहाडाला मुका मार लागला. आक्रमक झालेल्या शिवसैनिकांना पाहून किरीट सोमय्या यांनी आपला पुण्यातील कार्यक्रम रद्द करत महापालिकेतून काढता पाय घेतला होता.