तलाव सापडलाय समस्यांच्या विळख्यात : देखभालीकडे जिल्हा प्रशासन-तलाव सुधारणा प्राधिकार मंडळाचे साफ दुर्लक्ष

प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव शहराला लाभलेला ऐतिहासिक वारसा म्हणजे भुईकोट किल्ला व त्यासमोरील किल्ला तलाव. मात्र, सध्या हा किल्ला तलाव समस्यांच्या विळख्यात सापडलेला दिसतोय. आधी किल्ला तलावात दिसणारे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी नागरिक दररोज संध्याकाळी या ठिकाणी फेरफटका मारावयास येत असत. मात्र, काळानुरूप यात सुधारणा होण्याऐवजी या तलावाची दुरवस्था अधिकच झालेली पहावयास मिळत आहे.
सध्या नागरिकांच्या सोयीसाठी या ठिकाणी पाण्याची व्यवस्था, आसन व्यवस्था, पथदीप, शौचालयाची व्यवस्था यासह अनेक गोष्टींचा अभाव आहे. त्याबरोबरच किल्ला तलाव परिसरात फेरफटका मारण्यासाठी असलेला रस्ता देखील खराब झाला असून जागोजागी पेव्हर्स खचले आहेत. यामुळे वयोवृद्ध आणि महिला पाय अडकून पडण्याचे प्रकार वाढले आहेत.
2007 मध्ये किल्ला तलाव परिसराचा विकास करण्याचा प्रकल्प दर्शन उद्योग समूहाच्यावतीने हाती घेण्यात आला. यावेळी काही वर्षे किल्ला तलावाच्या सभोवती नागरिकांना सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. जसे की खाण्याचे स्टॉल, लहान मुलांना खेळण्यासाठी झोपाळे, डान्सिंग बॅग, रेल्वेची सफर यासह खेळाचे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. त्यामुळे नागरिक सायंकाळच्या वेळी या ठिकाणी गर्दी करत होते.
तलाव परिसरात विविध सुविधा, मनोरंजनात्मक साहित्य, खेळाचे साहित्य उपलब्ध करून देण्याचे काम तलाव सुधारणा प्राधिकार मंडळाकडे दिले आहे. मात्र, या नयनरम्य परिसराकडे आणि त्याच्या देखभालीकडे जिल्हा प्रशासन आणि तलाव सुधारणा प्राधिकार मंडळाने साफ दुर्लक्ष केल्यामुळे येथील खेळाचे साहित्य, रेल्वेगाडी, दुकाने धूळखात पडली आहेत.
डेकोरेटिव्ह लॅम्प बंद अवस्थेत
या ठिकाणी स्मार्ट सिटीअंतर्गत 7 लाख रुपये खर्च करून ई-टॉयलेट्स सुविधा करण्यात आली आहे. मात्र, हे ई-टॉयलेट सध्या बंद अवस्थेत असलेले पाहायला मिळत आहे. याबरोबरच 2018 मध्ये या ठिकाणी 60 डेकोरेटिव्ह लॅम्प बसविण्यात आले होते. पण सध्या ते बंद अवस्थेत असून यातील फक्त दहा लॅम्प चालू स्थितीत आहेत. येथील पथदीपदेखील दुरवस्थेत आहेत.
मॅजिक फाऊंटनचा प्रकल्पही बंद

दोन वर्षांपूर्वी एक कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी मॅजिक फाऊंटनचा प्रकल्प निर्माण केला होता. तो आठवडय़ातून दोनदा नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध होता. मात्र, गेल्या वर्षभरापासून हे मॅजिक फाऊंटन बंद पडलेले आहे. त्यामुळे कोटी रुपये निधी पाण्यात गेल्याचे दिसून येते. सध्या तलावाच्या विकासासाठी स्मार्ट सिटीअंतर्गत सहा कोटी रुपये निधी उपलब्ध झाला आहे. मात्र, या सहा कोटींचा उपयोग किल्ला तलावाला झालाच नसल्याचे येथील परिस्थिती पाहता दृष्टीस येते.
एकंदरीत येथील परिस्थिती पाहता किल्ला तलाव परिसरात पाहण्यासारखे आहे तरी काय? हा प्रश्न निर्माण होतोच.
गैरप्रकार थांबविण्याची गरज सध्या किल्ला तलावात प्रवेश करण्यासाठी प्रवेश शुल्क आकारले जात असल्याकारणाने व सुविधांचा अभाव असल्याने किल्ला तलाव परिसरात येणाऱया नागरिकांची संख्या कमी झालेली आहे. या परिसरात जुगार, मटका, पाकीटमार यासह अनेक गैरप्रकार वाढले आहेत. गांजा, हुक्का यासह अनेक अंमली पदार्थांचे सेवन या परिसरात होत असल्याचे निदर्शनास आले आहे. रात्रीच्या वेळी किल्ला तलाव परिसरात अंधार असल्यामुळे अनेक गैरकृत्ये वाढली आहेत. त्यामुळे या ठिकाणी पोलीस प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन येथील होत असलेले गैरप्रकार थांबविण्याची गरज आहे.