गाळे ताब्यात घेण्याची आमदारांची मागणी : कॅन्टोन्मेंट बोर्डची सर्वसाधारण सभा
प्रतिनिधी /बेळगाव
कॅन्टोन्मेंटने मागविलेल्या निविदा प्रक्रियेत पात्र कंत्राटदाराला स्वच्छता काम देण्याचा निर्णय घेण्यात आला. किल्ला परिसरात असलेल्या भाजी मार्केटच्या गाळय़ांचा दुरुपयोग होत असून हे गाळे ताब्यात का घेतले नाही, असा मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला.
ब्रिगेडियर रोहित चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली कॅन्टोन्मेंटची सर्वसाधारण सभा सोमवारी झाली. यावेळी विद्युत बिल भरणा करण्याच्या विषयासह विविध विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यात आले. कॅन्टोन्मेंटचा विद्युत पुरवठा तोडण्यात आल्याने कॅम्प परिसरातील पथदीप बंद झाले आहेत. परिणामी सर्वत्र अंधार पसरला आहे. पथदीप सुरू करण्यासाठी निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे निधी मिळविण्यासाठी कोणत्या पद्धतीने पाठपुरावा करावा लागेल, असा मुद्दा सरकार नियुक्त सदस्य सुधीर तुपेकर यांनी उपस्थित केला.
2012 पासून एसएफसी अनुदान बंद
राज्य शासनाने 2012 पासून एसएफसी अनुदान देण्याचे बंद केले आहे. शहरातून ये-जा करणारी बहुतांश वाहने कॅन्टोन्मेट हद्दीतून जातात. त्यामुळे शासनाकडून एसएफसी अनुदान दिले जाते. पण हे अनुदान देण्यात आले नसल्याने विद्युत बिलाची रक्कम भरली नसल्याचे रोहित चौधरी यांनी सांगितले. जर ही रक्कम शासनाने मंजूर केल्यास बिल भरता येईल त्याकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सरकार नियुक्त सदस्यांनी जिल्हाधिकाऱयांची भेट घेऊन विनंती करावी, असे रोहित चौधरी यांनी सुचविले. कॅन्टोन्मेट हद्दीतील स्वच्छतेची कामे करण्यासाठी आणि घरोघरी जाऊन कचरा जमा करण्यासाठी निविदा काढण्यात आल्या होत्या. या निविदा प्रक्रियेतील पात्र कंत्राटदारांना निविदा मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला.
कॅन्टोन्मेटच्या अखत्यारित येणाऱया किल्ला भाजी मार्केटमधील गाळे रिकामी झाले आहेत. या ठिकाणी असलेले भाजी मार्केट स्थलांतर झाल्याने या गाळय़ांचा उपयोग होत नाही. परिणामी या गाळय़ांमध्ये अवैद्य व्यवसाय सुरू आहेत. त्यामुळे हे गाळे ताब्यात घ्यावेत, अशी सूचना आमदार अनिल बेनके यांनी केली. पण न्यायालयीन वाद सुरू असल्याची माहिती कॅन्टोन्मेटच्या अधिकाऱयांनी दिली. सध्या भाडेकरू नाही. त्यामुळे वाद कसला, असा मुद्दा आमदार अनिल बेनके यांनी उपस्थित केला. सदर गाळे ताब्यात घेण्याच्यादृष्टीने कारवाई करण्याची सूचना केली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी के. आनंद तसेच कॅन्टोन्मेट बोर्डचे अधिकारी उपस्थित होते.