कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत पहाटेची दुर्घटना
प्रतिनिधी/ कुंकळ्ळी
कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत मासळीवर प्रक्रिया करणाऱया एका कारखान्यात अमोनियाची गळती होऊन त्याची बाधा झाल्याने जवळच्या ‘टॅप टूल्स’ या अन्य एका कारखान्यातील एका कामगाराला मृत्यू येण्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी पहाटे घडली. मयत कामगाराचे नाव किशनकुमार (22 वर्षे) असे असून तो मूळ उत्तर प्रदेशातील आहे, अशी माहिती पोलिसांकडून मिळाली. त्याच्याबरोबरच्या अन्य चार कामगारांची स्थितीही बिघडलेली असून त्यापैकी एकाची स्थिती गंभीर आहे.
प्रकृती गंभीर असलेल्या कामगाराला मडगावातील हॉस्पिसियोतून बांबोळी गोमेकॉत हलविण्यात आलेले आहे, तर इतर तिघांना हॉस्पिसियोतून पणजीतील इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत, अशी माहिती कुंकळ्ळीचे पोलीस निरीक्षक टेरिन डिकॉस्ता यांनी दिली.
पहाटेच्या वेळी गळती
पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, शुक्रवारी पहाटे हा प्रकार घडला. या घटनेत गळती एका कारखान्यात झाली व त्याची बाधा जवळच असलेल्या ‘टॅप टूल्स’ कारखान्यातील कामगारांना झाली. सदर कामगार रात्रपाळी संपल्यानंतर कारखान्याच्या आवारातील शेडमध्ये झोपले होते. तेथेच त्यांना बाधा झाली.
गुदमरायला लागल्यानंतर भोंगा वाजविला
विचित्र प्रकारचा वास यायला लागून कामगारांना गुदमल्यासारखे व्हायला लागल्यानंतर ‘टॅप टूल्स’ कारखान्यातील भोंगा वाजविण्यात आला. त्यासरशी झोपलेल्या अन्य कामगारांनी तिथून परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पळ काढला. मात्र वरील पाचजण बाधा होऊन बेशुद्ध पडल्याने ते हलू शकले नाहीत. यापैकी किशन कुमार याला जागीच मृत्यू आला, अशी माहिती मिळाली आहे.
गळती झालेल्या आस्थापनावर उशिरापर्यंत गुन्हा नाही
कुंकळ्ळी पोलिसांना या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तेथे धाव घेतली. निरीक्षक डिकॉस्ता यांनी पंचनामा करून मयत कामगाराचा मृतदेह हॉस्पिसियो इस्पितळात पाठविला आहे. या कामगाराच्या मृत्यूचे प्रकरण अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आले आहे. मात्र ज्या कारखान्यातून गळती झाली त्याच्यावर रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद झाला नव्हता. कुंकळ्ळी पोलिसांशी संपर्क साधण्यात आला असता त्यांच्याकडून तपास चालू असल्याचे सांगण्यात आले. सदर आस्थापनाविरुद्ध गुन्हा नोंद केला जाईल, असे निरीक्षक डिकॉस्ता यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले.
कारखान्यातील लोकांनी अग्निशामक दलालाही रोखले
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर तातडीने अग्निशामक दलाचे पथकही घटनास्थळी दाखल झाले. मात्र ज्या कारखान्यात ही गळती झाली त्या कारखान्यातील उपस्थित लोकांनी अग्निशामक दलाला रोखण्याचा प्रयत्न केला. तरीही त्यांनी शक्य तेवढी माहिती घेतली. अमोनियाची गळती कारखान्यातील कर्मचाऱयांच्या लक्षात आल्यावर त्यांनी सदर गळती थांबविल्याची माहिती मिळाली आहे. मासळीवर करण्यात येणाऱया प्रक्रियेच्या अंतर्गत मासळी थंड राहण्यासाठी अमोनियाचा वापर केला जातो.
यापूर्वीही घडल्या आहेत दुर्घटना
कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत यापूर्वीही अशा प्रकारच्या दुर्घटना घडलेल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी एक कारखाना जळून जाण्याचा प्रकार घडला होता. तसेच यापूर्वी पोलाद कारखान्यांत काही दुर्घटना घडल्या असून त्यापैकी बॉयलरचा स्फोट होऊन अनेक कामगारांना मृत्यू येण्याची घटना भरपूर गाजली होती. या वसाहतीतील प्रदूषणाचा प्रश्न हा सातत्याने गाजत आलेला असून या घटनेपासून दखल घेऊन संबंधित खात्याने सर्व कारखान्यांची पाहणी करावी व गरज असेल तेथील परिस्थिती जाग्यावर घालावी, अशी मागणी होत आहे. संबंधित खात्यांकडून याबाबतीत दुर्लक्ष होत असून त्यांच्याकडून वरचेवर पाहणी होणे आवश्यक आहे. तशी पाहणी होत नसल्याची प्रतिक्रिया लोकांनी व्यक्त केली आहे.