कारखाना २५ ऑक्टोबरनंतर सुरू करणार, एफ.आर.पी.सह सर्व देणी भागवली – चेअरमन नरके
प्रतिनिधी / वाकरे
कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना शेजारील कारखान्याप्रमाणे १५ ऑक्टोबरपासून सुरु करावा, हंगाम २०१७-१८ मधील उसाचे प्रतिटन १०० रुपये बिल त्वरित द्यावे आणि कर्मचाऱ्यांचा पगार त्वरित द्यावा अशा मागण्या राजश्री शाहू आघाडीने कारखान्याचे चेअरमन चंद्रदीप नरके यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्या. चेअरमन नरके यांनी कारखान्याने गेल्या हंगामातील एफआरपीसह सर्व देणी भागवली असून २५ ऑक्टोबरनंतर हंगाम सुरू करणार आणि उर्वरित १०० रुपये पैसे उपलब्ध झाल्यावर देणार असल्याचे यावेळी स्पष्ट केले.
शाहू आघाडीने निवेदनात हंगाम २०१७-१८ मध्ये गाळप झालेल्या ४ लाख ४० हजार मेट्रिक टन उसाचे प्रतिटन १०० रुपये शेतकरी कोरोनाच्या महामारीमुळे अडचणीत असल्याने व्याजासहित त्वरित द्यावे, तसेच शेजारील कारखाने १५ ऑक्टोबरला सुरू होणार असल्याने
यावर्षी जास्तीत जास्त गाळप होण्याच्या दृष्टीने १५ ऑक्टोबरला सुरू करावा, त्यासाठी योग्य नियोजन करावे आणि कर्मचाऱ्यांचा थकित असलेला पगार द्यावा अशा मागण्या केल्या.
चेअरमन नरके यांनी पत्रकार बैठकीत कारखान्याने गतवर्षीच्या हंगामातील उसाची एफआरपी २९२९ रुपये, तोडणी वाहतूक बिले, कमिशन आणि ५ महिन्याचा कर्मचारी पगार, सवलतीची साखर,व्यापारी पेमेंट ही सर्व देणी भागवली असल्याचे सांगितले.तसेच कारखान्यातील सर्व कामे सुरु असून २५ ऑक्टोबरनंतर कारखाना सुरू करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. मात्र राजकीय विषय न करता शाहू आघाडीसह सर्व घटकांनी एकत्र येऊन कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस बाहेरच्या कारखान्याला जाऊ नये यासाठी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. तसेच कारखान्याने २०१७-१८ मधील २ लाख २५ हजार मेट्रिक टन उसाचे १०० रुपये दिले असून ४ लाख ४० हजार मेट्रिक टनाचे उर्वरित बिल पैसे उपलब्ध झाल्यानंतर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.देशातील साखर उद्योग अडचणीत असून सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे आहे असे ते म्हणाले.
यावेळी बँकेचे यशवंत बँकेचे अध्यक्ष एकनाथ पाटील, उपाध्यक्ष हिंदुराव तोडकर, संचालक सर्जेराव पाटील,माजी अध्यक्ष संभाजीराव पाटील,माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी, प्रा.टी.एल.पाटील ,सज्जन पाटील,रणजीत पाटील निवास पाटील, विष्णू चौगुले,धनाजी पाटील,गुणाजी शेलार, कारखान्याचे कार्यकारी संचालक अशोक पाटील,सेक्रेटरी प्रशांत पाटील उपस्थित होते.