हशीश तस्करीनंतर आता आलिशान वाहनचोरी : खरेदी-विक्रीचा बेळगाव केंद्रबिंदू, बेळगाव पोलिसांचे अपयश

प्रतिनिधी /बेळगाव
एकेकाळी वेगवेगळय़ा देशांना अमलीपदार्थांचा पुरवठा करून ठळक चर्चेत आलेले बेळगाव शहर आता आंतरराज्य वाहनचोरांच्या टोळीमुळे पुन्हा प्रकाशझोतात आले आहे. देशभरातील अनेक राज्यात कार्यरत असलेल्या वाहन चोरांचे केंद्रबिंदू बनले आहे. कोल्हापूर पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे बेळगावात धक्काच बसला असून बेळगाव, बेंगळूर येथील आणखी सातजण पोलिसांच्या रडारवर आहेत, अशी माहिती मिळाली आहे.
कोल्हापूर पोलिसांनी 5 कोटी 5 लाख 50 हजार रुपये किमतीची 31 आलिशान वाहने जप्त केली आहेत. हशीश तस्करीच्या आरोपावरून सध्या हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या आकाश भालचंद्र देसाई, रा. बोळमल बोळ, शहापूर याच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे. कारागृहात राहून त्याने चोरीच्या वाहनांच्या खरेदी-विक्रीचा मोठा बाजार मांडल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.
जहीरअब्बास अब्दुलकरीम दुकानदार (वय 42) रा. न्यू गांधीनगर, यश प्रशांत देसाई (वय 26) रा. बोळमल बोळ, शहापूर, खलिदमहम्मद लियाकत सारवान (वय 40) रा. सुभाषनगर-बेळगाव या तिघा जणांना सध्या अटक झाली आहे. प्रशांत देसाई हा आकाश देसाईचा पुतण्या आहे. कोदाळी, ता. चंदगडजवळील ग्रीनहिल रिसॉर्ट परिसरात कोल्हापूर पोलिसांनी चोरीची वाहने जप्त केली आहेत. आकाश देसाईचा आणखी एक साथीदार राजकुमारकिरण सिंग रा. मणिपूर याच्या नावाचाही उल्लेख आला आहे.
वेगवेगळय़ा राज्यात चोरलेली वाहने आकाश देसाईच्या नेटवर्कच्या माध्यमातून नंबरप्लेटमध्ये खाडाखोड करून विक्री केली जात होती, अशी माहिती उघडकीस आली आहे. केवळ महाराष्ट्र-कर्नाटकच नव्हे तर दिल्लीसह वेगवेगळय़ा राज्यात चोरलेल्या वाहनांची मोठय़ा प्रमाणात विक्री करण्यात आली आहे. या संपूर्ण व्यवहाराचा केंद्रबिंदू बेळगाव असल्याची माहिती मिळाली आहे. कोल्हापूर पोलिसांचे पथक या प्रकरणाची पाळेमुळे खणण्याच्या मागे हात धुवून लागले आहे.
वेगवेगळय़ा व्यवसायात नुकसानीत आलेल्या काही महाभागांनी सध्या आलिशान कारगाडय़ांची चोरी व त्यांच्या खरेदी-विक्रीचा धंदा थाटला आहे. सध्या बेळगाव येथील तिघाजणांना अटक झाली आहे. आणखी किमान चौघा जणांसाठी पोलिसांनी जाळे टाकले असून या प्रकरणात बेंगळूर येथील गुन्हेगारांचाही सहभाग आहे. बेळगाव परिसरातील चार व बेंगळूर परिसरातील तीन असे एकूण सातजणांचा शोध घेण्यात येत असून सध्या ते महाराष्ट्र पोलिसांच्या रडारवर आहेत.
वाहनचोरी प्रकरणात आकाश देसाईचे नाव सामोरे आल्यानंतर त्याच्या यापूर्वीच्या व्यवहारांचीही पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. 28 मे 2007 रोजी गोवावेसजवळ आकाश देसाईला अटक झाली होती. त्याच्या वाहनातून तब्बल 5 किलो हशीश जप्त करण्यात आले होते. एक रिव्हॉल्व्हर, 10 जिवंत काडतुसे, दोन मोबाईल जप्त केले होते. टिळकवाडीचे तत्कालिन पोलीस निरीक्षक व सध्याचे पोलीस उपअधीक्षक महांतेश्वर जिद्दी व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली होती.
नेटवर्कचा वापर करून चोरीच्या कारचा खरेदी-विक्रीचा धंदा
या प्रकरणी 31 डिसेंबर 2018 रोजी येथील द्वितीय जिल्हा सत्र न्यायालयाचे न्या. एम. एच. अन्नयन्नवर यांनी आकाश देसाईसह चौघा जणांना दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. सध्या आकाश व त्याचे साथीदार असीफ बुऱहाणवाले, मुन्ना ऊर्फ मोहम्मदअली सय्यद, सज्जन नरसिंग हरवळकर हे शिक्षा भोगत आहेत. या प्रकरणी कारावास भोगत असतानाच आकाशने आपल्या नेटवर्कचा वापर करून चोरीच्या कारची खरेदी-विक्रीचा धंदा थाटल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.
आकाश देसाईचे नेटवर्क पुन्हा सक्रिय झाले असेल तर त्याची माहिती बेळगाव पोलिसांना कशी मिळाली नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जुन्या कारच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणारे अनेक जण या धंद्यात असून किमती वाहने चोरून त्याची परस्पर विक्री केली जाते. या व्यवसायातील बहुतेक जण वेगवेगळय़ा कारणाने कर्जबाजारी झालेले असेच आहेत. दिल्लीत चोरलेल्या वाहनांची कर्नाटकात, बेंगळूर येथे चोरलेल्या वाहनांची चेन्नईत, चेन्नई येथे चोरलेल्या वाहनांची महाराष्ट्रात विक्री करण्यात आली आहे.
बनावट कागदपत्रे तयार करून विक्री
एखाद्या वाहनाची चोरी केल्यानंतर बनावट कागदपत्रे तयार करून त्याची विक्री केली जाते. स्वस्तात नवीन कार मिळणार म्हणून खरेदी करणाराही खूप खोलात जात नाही. त्यामुळे या टोळीचे चांगलेच फावले आहे. काही महागडय़ा व आलिशान मोटारींची चोरी करण्यासाठी सॉफ्टवेअर हॅक करण्याची कलाही या टोळीतील गुन्हेगारांनी आत्मसात केली आहे. बेळगाव येथे माळमारुती येथून अशाच एका कारची सॉफ्टवेअर हॅक करून चोरी करण्यात आली होती. चोर तामिळनाडूतील होता. त्याला अटक केल्यानंतर आधुनिक वाहनांची चोरी कशी होते, याचा उलगडा झाला होता. लॅपटॉप हातात घेऊन कार पळविण्यात येते. या प्रकाराने पोलीस यंत्रणाही थक्क झाली होती. आता आंतरराज्य वाहनचोरी व खरेदी-विक्रीचे केंद्र बेळगावात बनल्याचे उघडकीस आल्याने बेळगाव पोलिसांनाही धक्का बसला आहे. कारण कोल्हापूर पोलिसांनी एकापाठोपाठ एक अशी आलिशान वाहने बेळगाव येथून नेली तरी त्याची पुसटशी खबरही बेळगाव पोलिसांना नव्हती.
बेळगाव पोलिसांचा हलगर्जीपणा की मिंधेपणा?
बेळगाव पोलीस दलातील काही अधिकाऱयांच्या हलगर्जीपणामुळे गुन्हेगारांचे चांगलेच फावले आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे कारचोरी प्रकरण आहे. वेगवेगळय़ा राज्यातून चोरून आणलेली वाहने बेळगाव येथे विकण्यात आली आहेत. काही प्रकरणात तर पोलीसच खरेदीदार आहेत. काही अधिकारी तर या टोळीतील गुन्हेगारांचे लाभार्थी आहेत. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे कारागृहात राहूनही त्याने हा व्यवसाय थाटला की पोलिसांच्या मिंधेपणामुळे त्याचा हा व्यवसाय भरभराटीला आला, याची पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी चौकशी करण्याची गरज आहे. 11 वर्षांपूर्वी हिरेबागेवाडीचे तत्कालिन पोलीस उपनिरीक्षक (सध्याचे निरीक्षक) विजयकुमार शिन्नूर यांनी आकाश देसाईसह सात जणांना अटक करून 21 वाहने जप्त केली होती. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
हशीशची आंतरराष्ट्रीय स्तरावर विक्री
हशीशची तस्करी करण्यासाठी हिंदू देवदेवतांच्या फोटोंचा वापर करण्यात येत होता. फोटोच्या मागे हशीश लपवून त्याला प्रेम बसविण्यात येत होती. चेन्नई विमानतळावर तपासणीच्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. केंद्रीय यंत्रणा बेळगाव येथे कारवाई करणार, तोच बेळगाव पोलिसांच्या तावडीत आकाश देसाई सापडला होता. स्कॉटलंड, ब्रिटन, झांबिया, सेशेल्स, अमेरिका, जोहान्सबर्ग, दुबईसह नऊ देशांना बेळगाव येथून हशीशची तस्करी केली जात होती. हशीश तस्करी प्रकरणी शिक्षा भोगणारा आकाश देसाई आता वाहनचोरी प्रकरणातही ठळक चर्चेत आला आहे.