रामराव देसाई मोठे आव्हान उभे करण्याची शक्यता, बाळकृष्ण होडारकर यांच्या काँग्रेस प्रवेशाने नवी कलाटणी, निवडणूक लढवू पाहणाऱया इच्छुकांमध्ये वाढ

प्रतिनिधी /कुडचडे
सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचे वेध प्रत्येक मतदारसंघाला लागले आहेत व सुरु झालेल्या घडामोडींवरून ते दिसून येत आहे. कुडचडे मतदारसंघातही त्यादृष्टीने हालचाली सुरू झालेल्या आहेत. येथील दावेदारांची संख्या आठवर पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या तरी सात उमेदवार रांगेत उभे आहेत.
वीजमंत्री असलेले भाजपाचे सध्याचे कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल, माजी आमदार रामराव देसाई तसेच माजी नगरसेवक आनंद प्रभुदेसाई यांच्याव्यतिरिक्त आणखी चार इच्छुक उमेदवार पुढे सरसावले आहेत. त्यात अमित पाटकर, हर्षद गावस देसाई, माजी नगराध्यक्ष बाळकृष्ण होडारकर, आदित्य देसाई यांची नावे चर्चेत आहेत. तसेच आम आदमी पक्षाचा उमेदवारही उतरणार असल्याची चर्चा आहे. वरील सारे कुडचडेतील लोकांचा विश्वास जिंकण्याच्या प्रयत्नात सध्या दिसू लागले आहेत.
बाळकृष्ण होडारकर
हल्लीच झालेल्या कुडचडे पालिकेच्या निवडणुकीच्या निकालांनी बऱयाच जणांची समिकरणे बिघडवून टाकली आहेत. निकालानंतर पालिका मंडळ स्थापन करण्यास विलंब झाला. त्यानंतर एका मताच्या फरकाने नगराध्यक्षपदी निवडून आलेल्या बाळकृष्ण होडारकर यांच्यावर एका तासात अविश्वास ठराव आणून त्यांना हटविण्यात आले. यात स्थानिक आमदार काब्राल यांचा हात असल्याचा दावा होऊन त्याचा गाजावाजा झाला. त्यातून विधानसभा निवडणुकीसाठीच्या इच्छुकांत होडारकर यांची भर पडली आहे. मंत्री काब्राल यांचे यापूर्वीचे जवळचे मित्र व पालिका निवडणुकांनंतर त्यांचे कट्टर विरोधक बनलेले होडारकर हे आता काँग्रेस पक्षात सामील झाल्यामुळे नवीन कलाटणी मिळाली आहे.
याअगोदर होडारकर यांनी नगरसेवक म्हणून भार संभाळला आहे. त्यानंतर मागील पालिका मंडळाचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या अगोदर त्यांनी नगराध्यक्षपद सांभाळल. हल्लीच झालेल्या पालिका निवडणुकांत परत एकदा मतदारांनी त्यांना निवडून आणले. कोणतेही काम करण्यास विलंब न लावता पावले उचलणे, प्रत्येक कामात सहकाऱयांचे मार्गदर्शन घेणे, सर्वांना सन्मान देणे या स्वभाव वैशिष्टय़ांमुळे कुडचडेचे मतदार त्यांना कौल देणार असा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे.
आनंद प्रभुदेसाई
कुडचडे पालिकेची निवडणूक जाहीर झाली त्या दिवसापासून विधानसभा निवडणुकीसाठी पुढे सरसावलेले आणखी एक इच्छुक म्हणजे आनंद प्रभुदेसाई आहेत. कित्येक वर्षांपासून ते स्थानिक राजकारणात आहेत. त्यांनी पालिका निवडणुकीत कधीच हार घेतलेली नाही. नगरसेवक असताना कामे करण्यात जी तत्परता दाखविली तशीच तत्परता त्यांनी पदावर नसतानाही दाखविली आहे. पालिका निवडणुकीत प्रभुदेसाई यांनी स्वतःचे पॅनल उतरविले व त्यातील दोन उमेदवार निवडून आल्यावर विधानसभा निवडणुकीत उतरणार असल्याचे जाहीर केले. तोच हेतू घेऊन सध्या ते पुढे पावले टाकत आहेत.
रामराव देसाई
याअगोदर कुडचडेचे प्रतिनिधीत्व केलेले व गोव्यातील राजकारणात आपला ठसा उमटविलेले माजी आमदार रामराव देसाई यांचे आव्हान यावेळी काब्राल यांच्यासमोर उभे राहण्याची शक्यता दिसत आहे. कित्येक वर्षे झाली, पण कुडचडेची जनता अजूनही देसाई यांनी कुडचडेसाठी केलेल्या कार्याचा उल्लेख करताना दिसते. त्यात त्यांनी पायाभरणी केल्यानंतर अवघ्या एका वर्षात साकारलेले कुडचडेतील रवींद्र भवन, जी-सुडा मार्केट, काकोडा तंत्रनिकेतन, काकोडा औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, केपेतील वाहतूक कार्यालय, कुडचडे व सावर्डेला जोडणारा नवीन पूल यांचा समावेश होतो. आजपर्यंत साळावली धरण जवळ असून सुद्धा सांगेच्या लोकांना टँकरने पाणी पुरविले जाते. पण कुडचडेच्या जनतेला पाण्याची कोणतीच अडचण येत नाही याचे कारण देसाई हेच असल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ व्यक्तींकडून ऐकू येते. परत एकदा कुडचडेची धुरा सांभाळण्याची क्षमता त्यांच्यात आहे व त्यासाठी त्यांना मतदार पूर्ण सहकार्य देतील, असा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे. याअगोदर ज्या वेळेस ते आमदार होते तेव्हा कुडचडेतील जनतेला त्यांनी पूर्ण सहकार्य केले होते याकडे ते लक्ष वेधताना दिसत आहेत.
अमित पाटकर
त्याचबरोबर नवीन चेहऱयाची गरजही व्यक्त होऊ लागली असून त्यादृष्टीने कुडचडेत अमित पाटकर यांच्या रूपाने नवीन नाव पुढे आलेले आहे. ते समाजसेवक व व्यावसायिक आहेत. समाजसेवा व लोकांना मदत करत राहण्याचा हेतू बाळगणारे पाटकर हे आता लोकांना जवळचे झालेले आहेत. ते कुडचडेतील सर्वसामान्यांच्या अडचणी सोडविण्यास सक्षम आहेत. तसेच पाटकर हे युवा असल्याने युवा पिढीच्या समस्यांची त्यांना जाणीव आहे व कुडचडेतील युवावर्ग त्यांच्याबरोबर राहील, असा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे.
हर्षद गावस देसाई
मागील दोन वर्षांपासून कुडचडेतील राजकारणात लक्ष वेधून घेणारे हर्षद गावस देसाई हेही कुडचडेतील लोकांच्या अडचणींविषयी आवाज उठवत आलेले आहेत व त्याचा फटका काब्राल यांना बसण्याची शक्मयता व्यक्त केली जात आहे. भाजप उमेदवाराच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने त्यांनी जिल्हा पंचायत निवडणूक लढविली होती. अवघ्या काही मतांनी त्यांची हार झालेली असली, तरी लोकसेवची जिद्द कायम ठेऊन विधानसभा निवडणुकीत उतरण्याचा उत्साह त्यांनी दाखविला आहे.
नीलेश काब्राल
सध्याचे कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल हे राज्य सरकारातील मंत्री असले, तरी विकासाच्या मुद्यावर लोकांमध्ये नाराजी व्यक्त होताना दिसत आहे. कुडचडेत हजारोंच्या संख्येत बेरोजगार आहेत. अशा परिस्थितीत जनतेला काब्राल निवडणुकीपूर्वी या मुद्यावर दिलासा देण्यात कसे यशस्वी ठरतात ते पाहावे लागेल. पुढील पाच महिने व त्यात मान्सून, कोरोना महामारीचा कहर यात ते कोणती पावले उचलतात याकडे मतदारांचे लक्ष लागून आहे. कुडचडेतील बसस्थानक, स्विमिंग पूल मार्गी लावण्यावर तसेच जनतेसाठी उपयुक्त असे नवीन प्रकल्प आणण्यावर काब्राल भर देतील अशी अपेक्षा जनता करत आहे. त्यांच्याजवळ कुडचडेची मतदारशक्ती बऱयाच प्रमाणात आहे हे सत्य असले, तरी सध्या कुडचडेतील जनतेची स्थिती चांगली राहिलेली नाही. बाजार पूर्णपणे खालावलेला आहे. व्यापारी व अन्य सामान्य लोकांची आर्थिक स्थितीही बिकट झालेली आहे. कुडचडेचे आमदार या नात्याने आपल्या मतदारांना सावरणे हे सध्या तरी त्यांच्यासाठी एक मोठे आव्हानच आहे. अशा स्थितीत काब्राल हे दिलासा देण्यासाठी पुढे येतील अशी मतदारांची अपेक्षा आहे.
कुडचडेतील विधानसभा निवडणुकीत विविध इच्छुक उमेदवार कोणत्या पक्षातर्फे उतरतात यावर काही प्रमाणात स्थानिक आमदारांबरोबर प्रत्येकाचे भवितव्य अवलंबून असेल असे दिसून येत आहे. त्याचबरोबर कुडचडेत बदल आवश्यक आहे असेही मत व्यक्त होताना पाहायला मिळत आहे. कुडचडेतील आजपर्यंतचा अनुभव पाहता ज्यांना मतदारांनी उचलून धरले त्यांनी यश प्राप्त झाल्यावर त्यांच्यासाठी सर्वस्व पणाला लावलेल्यांच्या हातावर तुरी दिली व नंतर त्या जागी वेगळेच चेहरे तयार झाले, असे दिसून आलेले आहे. आगामी निवडणुकीत काँग्रेस सत्तेवर येणार व त्यात कुडचडे मतदारसंघही काँग्रेसचाच होणार असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, आम आदमी पक्ष हेही कुडचडेत ताकद दाखविण्याची शक्मयता आहे. तसेच रिव्हॉल्युशनरी गोवातर्फे कुडचडेत उमेदवार उतरविला जाणार असे संकेत मिळू लागले आहेत.