जिल्हय़ात बेळगाव तालुक्यातील तिघांना पहिल्यांदा लागण
वार्ताहर/ कुडची
दिल्ली येथील तबलिगी कार्यक्रमातून परतलेल्या बेळगाव तालुक्यातील तिघांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले होते. यातून बेळगाव जिल्हय़ातही कोरोनाचा शिरकाव झाल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली. असे असतानाच रविवारी रायबाग तालुक्यातील कुडची येथील तीन महिला व एक युवक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाल्याने खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर कुडचीसह तीन किलोमीटरचा परिसर पूर्णपणे सील करण्यात आला असून अधिकारी वर्गानेही ठाण मांडले आहे. सदर चौघा कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना येथील एका सरकारी इमारतीत क्वारंटाईन करण्यात आले आहे. गत चार दिवसापूर्वी जिल्हय़ात एकही रुग्ण नसलेल्या बेळगाव जिल्हय़ात 7 जणांना कोरोनाची लागण झाल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रविवारी सायंकाळच्या सुमारास कुडची येथील चौघांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समजताच कुडचीसह रायबाग तालुक्यात एकच खळबळ उडाली. जिल्हा आणि तालुका प्रशासनाने याची दखल घेत रविवारी रात्रीच कुडची येथे धाव घेत सर्व ती खबरदारी घेण्याबरोबरच सर्वत्र नाकाबंदी केली. येथील रस्त्यावर रविवारी रात्री व सोमवारी दिवसभरात एकही नागरिक पहावयास मिळाला नाही. सर्व रस्ते ओस पडले असून शहरात सर्वत्र शुकशुकाट पसरला आहे. तसेच पोलीस प्रशासनानेही खबरदारी घेताना बंदोबस्तात वाढ केली आहे.
शहरातील मेडिकल, दवाखाने, किराणा दुकाने, दूध विक्री केंद्र, पेट्रोलपंपही बंद करण्यात आले आहेत. येथील मुख्य मार्गावर सन्नाटा पसरला आहे. नगर परिषदेच्यावतीने कोरोनाबाधित रुग्ण आढळलेल्या वॉर्डामध्ये जंतूनाशक फवारणी केली जात आहे. तसेच रिक्षा व नगर परिषदेच्या माध्यमातून नागरिकांना घरीच थांबा, घराबाहेर पडू नका, परगावाहून किवा अन्य ठिकाणाहून कोणी आले असल्यास तपासणी करून घेण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात येत आहे.
46 जणांना क्वारंटाईन…
चौघांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट होताच त्यांच्या संपर्कात आलेल्या 46 जणांची यादी बनवून त्यांना येथील एका सरकारी इमारतीत दाखल करून त्यांना क्वारंटाईन केले आहे. त्यांची तपासणी करण्यात येणार असून जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती तहसीलदार चंद्रकांत बजंत्री यांनी दिली.
क्वारंटाईन इमारत परिसरात बंदोबस्त
कुडची शहरासह सुमारे 3 कि. मी. चा परिसर पूर्णपणे सील करण्यात आला आहे. परिसरातील 9 रस्त्यांवर नाकाबंदी केली असून पोलीस फौजफाटाही तैनात केला आहे. यासह केएसआरपीच्या तुकडय़ाही दाखल झाल्या आहेत. 46 नागरिकांना क्वारंटाईन केलेल्या इमारत परिसरात बंदोबस्त ठेवला असल्याचे अथणी पोलीस उपअधीक्षक एस. व्ही. गिरीष यांनी सांगितले.
अधिकारी वर्गाचे ठाण…
कुडची येथील चौघांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट होताच जिल्हा आणि तालुका पातळीवरील अधिकाऱयांनी कुडची येथे धाव घेतली. यानंतर आवश्यक ती खबरदारी घेताना सतर्क राहण्याचा सूचना केल्या. यामध्ये तहसीलदार, अथणीचे डीएसपी, तालुका वैद्याधिकारी, कुडचीचे वैद्याधिकारी, नगर परिषद कर्मचारी, स्थानिक पोलीस कर्मचारी यांनी आपापल्या पातळीवर नियोजन करताना परिस्थितीवर लक्ष ठेवताना कुडचीत ठाण मांडले आहे.
क्वारंटाईन वेगवेगळय़ा खोलीत
कोरोना बाधित असलेल्या चौघांच्या संपर्कात आलेल्या एकूण 46 जणांना खबरदारी म्हणून येथील सरकारी वसतिगृहाच्या इमारतीत दाखल करण्यात आले आहे. जेणे करून त्यांच्यातही कोणाला लागण झाली असल्यास त्यांचे संक्रमण होणार नाही, याची काळजी प्रशासनाने घेतली आहे. त्यांना येथील प्रत्येक खोलीत वेगवेगळे ठेवण्यात आले आहे. त्यांच्यात लक्षणे आढळल्यास त्यांना बेळगाव येथे पुढील तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे समजते.